– ‘आम्ही सारे भारतीय’ संघटनेची पत्रकार परिषद; १९ जुलैपासून साखळी उपोषण आंदोलनाची घोषणा
नागपूर :- दिल्ली येथे पर्यावरणवादी, वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी ‘आम्ही सारे भारतीय’ संघटनेच्या वतीने नागपुरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून सरकार या गंभीर प्रश्नाकडे असंवेदनशीलपणे पाहत आहे. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात १९ जुलै २०२६ पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच, या आंदोलनात सामाजिक, राजकीय व विविध जनसंघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला अशोक सरस्वती, कॉ. अरुण लाटकर, सरदार जगजीत सिंग, डॉ. विनय बारहाते, बाबा शेळके, अरुण गाडे, प्रा. रमेश पिसे, दिनेश अंडर शहरो, डॉ. सुरेश बर्वे, विलास भोंगाडे, प्रा. राहुल मून यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.








