– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त लाभार्थ्यांना वितरण
नागपूर :- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर महानगरपालिका, राज्य सफाई कर्मचारी आयोग, जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागातर्फे सेवा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ई-रिक्षांचे वाटप आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सायकलीसह 6 कोटी रुपये किंमतीचे विविध उपयोगी साहित्यांचे वितरण करून त्यांच्या समर्पित सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर, महापौर निता ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त डॉ. विपीन व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.

इमामवाडा परिसरातील कुंदनलाल गुप्त ग्रंथालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर होते. यावेळी धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, नगरसेवक लखन येरावार, नगरसेविका पूजा पाठक, नगरसेवक रितेश गावंडे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुकेशनी तेलगोटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी मनपा कटिबद्ध- महापौर
यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी नागपूर मनपा कटिबद्ध असल्याचे सांगितले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका मोलाची आहे. हे लक्षात घेऊनच सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल तसेच कायम नोकरीचे नियुक्ती पत्राचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांचे काम सेवा व समर्पणाचे – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सफाई कर्मचारी सेवा व समर्पणाच्या भावनेने शहरात अहोरात्र काम करीत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांवर तात्काळ व सहानुभुतीने निर्णय घेतात. सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल देण्याचे काम सुरू आहे. विविध टप्प्यात घरकुल बांधून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांना जास्तीतजास्त सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस नेहमीच सकारात्मक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
प्रास्ताविक राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर यांनी केले. यावेळी त्यांनी समाजातील तरुणांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. या संकल्पनेतूनच ई-रिक्षा व शिलाई मशीनचे वितरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल गडलिंग यांनी केले.








