spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘जेन-झी’चा वाढता स्क्रीन टाइम चिंताजनक; मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता – विश्वास नांगरे पाटील

नागपूर :- वाढता स्क्रीन टाइम आणि मोबाईलवरील सततच्या स्क्रोलिंगच्या सवयीमुळे सध्याच्या ‘जेन-झी’ पिढीच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर परिणाम होत असल्याची चिंता नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

भोसला मिलिटरी स्कूलतर्फे रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या तरुण पिढीसमोरील आव्हानांवर भाष्य केले.

नांगरे पाटील म्हणाले, “सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही सेकंदांच्या अंतराने मोबाईलवर सतत स्क्रोलिंग होत असल्याने मेंदूचे लक्ष वारंवार विचलित होते. यामुळे मेंदूमध्ये नेमके कोणते रासायनिक बदल घडत आहेत, याचा अजूनही अभ्यास सुरू आहे. त्यामुळे बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाबरोबरच कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी लहानपणापासून योग्य सवयी आणि संस्कार जोपासणे गरजेचे आहे.”

ते पुढे म्हणाले, “जेन-झी हीच भारताचे भविष्य आहे. मात्र, सध्याच्या काळात या पिढीशी संवाद साधणेही अनेकदा कठीण होत असल्याचे जाणवते.”

यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. “पोलीस असोत किंवा सीमेवरील जवान, त्यांचे काम हे अनेकदा ‘थँकलेस जॉब’ असते. कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी टीका सहन करावी लागते. गेल्या काही दिवसांपासून मलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे,” असे त्यांनी सांगितले.

कारगिल युद्धाचा उल्लेख करताना नांगरे पाटील म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिकांनी शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाच्या बळावर विजय मिळवला. कारगिल विजय दिन हा केवळ युद्धातील विजयाचा उत्सव नसून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले.

Popular Articles