spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापालिकेच्या उद्यान विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) ची मागणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागात झालेल्या कथित गैरव्यवहार व आर्थिक अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) नागपूर शहराचे संघठन सचिव नंदकिशोर माटे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केली. माटे यांनी सांगितले की, गड्डी गोदाम ते ऑटोमोटिव्ह चौक या मेट्रो मार्गावरील पुलाखालील दुभाजकाचे सुशोभीकरण, वृक्षारोपण व देखभालीच्या कामाबाबत माहिती अधिकारातून माहिती मागविण्यात आली होती. मात्र सुरुवातीला समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा माहिती मागितल्या नंतर संबंधित कामाचे कंत्राट १९ मे २०२५ रोजी संपुष्टात आल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र, महा मेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित परिसरातील वृक्षारोपण, देखभाल, दुरुस्ती अथवा सुशोभीकरणाची कोणतीही कामे महा मेट्रोने केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे महापालिकेच्या नोंदीनुसार या कामासाठी १ कोटी ४१ लाख ९९ हजार ६६९ रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असून, आठ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आजही काम अपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित कंत्राटदाराकडे विचारणा केली असता त्यांनी महापालिकेशी संपर्क साधण्यास सांगितल्याचेही माटे यांनी नमूद केले. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याची शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या पैशांचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,अशी मागणी नंदकिशोर माटे यांनी पत्रपरिषदेत केली. त्यांनी या संदर्भातील छायाचित्रेही पत्रकारांसमोर सादर करून संबंधित परिसरातील कामांची सद्यस्थिती दाखवून दिली. यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित नंदकिशोर माटेसह शिवसैनिक निरंजन दहिवले आणि महेंद्र भांगे यांची उपस्थिती होती.

Popular Articles