spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

झाशीनगर शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दिमाखदार भरारी

– इयत्ता चौथी व सातवीतील दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र; मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे प्रतिनिधी

झाशीनगर :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा, झाशीनगर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोमवारी शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवीचा विद्यार्थी देवांश यशवंतराव मेश्राम तसेच इयत्ता चौथीची विद्यार्थिनी विधी दिलीप कोरेटी यांनी उल्लेखनीय यश मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरण्याचा मान मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल शाल, पुष्पगुच्छ आणि अभिनंदनपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास अर्जुनी मोर शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर मेश्राम, केंद्रप्रमुख अभय बिसेन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश मेश्राम, समिती सदस्य हंसराज डोमळे व दिलीप कोरेटी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक रमेश गायकवाड, पदवीधर शिक्षक निपल राऊत, सहाय्यक शिक्षक नरेश परशुरामकर, राजेंद्र गवळ, हेमंत डोंगरवार, निलेश गरपल्लीवार, नितेश सागरे, स्वयंसेवक हितेश मोहुर्ले, शुभांगी मोहुर्ले, विद्यार्थ्यांचे पालक यशवंतराव मेश्राम तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची खरी कसोटी असल्याचे सांगितले. शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्राथमिक स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास भविष्यातील अनेक संधी उपलब्ध होतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांनी भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा, झाशीनगरचे नाव तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक, पालक आणि सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरणामुळे हा सत्कार सोहळा संस्मरणीय ठरला.

मान्यवरांचे मार्गदर्शन

“शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची खरी ओळख आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचतात. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शाळेचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे.”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.