मुंबई/ नागपूर :- प्रकाशगड, मुंबई येथे महावितरणचे अधिकारी, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस व स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीच्या प्रतिनिधींसोबत तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे व राज्य उपाध्यक्ष धिरज घायवट उपस्थित होते. बैठकीत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक सबस्टेशनवर पुरेसे ऑपरेटर नियुक्त करून साप्ताहिक सुट्टी देणे, स्टेशनरी साहित्य व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा साहित्य (PPE) वाटप, दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन अदा करणे, वेतनातील कपात, बोनस, रजा व थकीत एरिअर्स, पेमेंट स्लिप, PF व ESIC तसेच इतर विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत दोन सबस्टेशनसाठी एक रिलीव्हर ऑपरेटर नियुक्त करून सर्व ऑपरेटरांना साप्ताहिक सुट्टी देण्याचे आश्वासन देण्यात आले. उर्वरित सबस्टेशनवर आवश्यक सुविधा व सुरक्षा साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संबंधित कंपन्यांनी सांगितले. वेतन वेळेत देण्यासाठी हजेरीपत्रक ३ तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून विलंब करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. बोनस, थकीत एरिअर्स तसेच PF व ESIC संदर्भातील प्रलंबित बाबींची चौकशी करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच कामगारांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींचे संपर्क तपशील संघटनेला उपलब्ध करून देण्यात आले. बैठकीतील निर्णयांमुळे कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीस गती मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.








