नागपूर :- “सर्वप्रथम विदर्भ वेगळा झालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडत विदर्भ राज्य आंदोलन समिती च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंग मार्च’ व जनजागरण अभियानाची माहिती देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ‘क्रांती दिन’ निमित्त रविवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. नागपूरातील जनतेमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची तीव्रता अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी १.३० वाजता संविधान चौक येथे लॉंग मार्चचा समारोप होऊन विदर्भ निर्माण जनसंकल्प जाहीरसभा होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी विदर्भ राज्याची तब्बल १२१ वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी आता कायमस्वरूपी निकाली काढावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. पत्रपरिषदेत बोलतांना विदर्भ आंदोलनाचे नेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर, व्याजाचा बोजा, कंत्राटदारांची प्रलंबित देयके, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना २०२६ तसेच विविध थकबाकी व बिलांसह सुमारे ₹९६ हजार ४०० कोटींची देयके प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान अहेरी येथेही विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ आंदोलनाचे नेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्यासह मुकेश मासुरकर, अरुण केदार, नरेश निमजे, प्रशांत नखाते, भोजराज सरोदे आणि रमेश गजबे उपस्थित होते.
९ ऑगस्टच्या विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंग मार्चची घोषणा; विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनजागरणाला वेग









