spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

E-20 इथेनॉल धोरणाविरोधात खासदार डॉ. प्रशांत पडोळे आक्रमक; संसद परिसरात जोरदार निदर्शने

– “वाहनधारकांचे नुकसान थांबवा, खराब होणाऱ्या वाहनांची जबाबदारी सरकारने स्वीकारावी”

हंसराज,भंडारा नवी दिल्ली :- केंद्र सरकारच्या E-20 इथेनॉल मिश्रित इंधन धोरणामुळे सामान्य वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज संसद परिसरात आक्रमक आंदोलन केले. “पर्यावरणाच्या नावाखाली जनतेला लुटू नका; E-20 मुळे खराब होणाऱ्या वाहनांची जबाबदारी सरकारने स्वीकारावी,” अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

देशभरात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित (E-20) इंधनाचा पुरवठा केला जात आहे. मात्र, या इंधनामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होणे, मायलेज अचानक घटणे, इंजिनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होणे आणि परिणामी दुरुस्तीचा खर्च वाढणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याच गंभीर विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. पडोळे यांनी संसदेच्या प्रांगणात निदर्शने करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

सखोल चौकशीची मागणी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, “E-20 इंधनामुळे वाहनांचे जे नुकसान होत आहे, त्याची केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी. सामान्य नागरिक कष्टाच्या पैशातून वाहन खरेदी करतो, मात्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे त्याच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वाहन उत्पादक कंपन्या, तेल कंपन्या आणि सरकार यांच्यात समन्वय नसल्याने आज सामान्य वाहनधारक भरडला जात आहे.”

नुकसानभरपाईसाठी यंत्रणा उभारा खासदार पडोळे यांनी यावेळी ठाम भूमिका मांडली की, “जर E-20 इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असेल, तर त्याची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. नुकसानग्रस्त वाहन मालकांना तातडीने भरपाई देण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा उभारावी आणि या तांत्रिक बिघाडाला कारणीभूत असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.”

जनआंदोलनाचा इशारा केवळ घोषणाबाजी न करता सरकारने यावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी करत डॉ. पडोळे यांनी इशारा दिला की, “वाहनधारकांच्या हितासाठी हा लढा संसदेपासून रस्त्यापर्यंत लढला जाईल. सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास आगामी काळात देशभरात व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.” खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संसद परिसरात आज हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले असून, आता सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्व वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.