spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूल!

– आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, संत गोरा कुंभार नाटिका, अभंग-नृत्याविष्कारातून विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा

मेंढला प्रतिनिधी :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूलमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती आणि संत विचारांचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण शाळा परिसर अक्षरशः पंढरीमय झाला होता.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि अभंग गायनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून आकर्षक दिंडी काढली. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांच्या हातात भगवे पताके, टाळ, चिपळ्या आणि तुळशीची रोपे असल्याने वारकरी परंपरेचे जिवंत चित्र उभे राहिले.

यावेळी विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी नाटिका सादर करून भक्ती, प्रामाणिकपणा, श्रमप्रतिष्ठा आणि समतेचा संदेश दिला. भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. अभंग, हरिपाठ आणि संतवाणीच्या सादरीकरणामुळे वातावरण अधिकच भक्तिरसात न्हाऊन निघाले.

कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार यांसारख्या संतांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली. भारतीय संस्कृती, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करण्याच्या शाळेच्या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या शुभांगी अर्डक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले..

संस्कार, संस्कृती आणि शिक्षणाचा सुंदर संगम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि नैतिक मूल्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आषाढी एकादशीसारखे सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, शिस्त, एकता, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राभिमानाची भावना दृढ करतात. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा मिळते आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यास हातभार लागतो.

Popular Articles