नागपूर :- साहित्यभूषण, लोकशाहीर तथा साहित्यसम्राट तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व जैमिनीकडू मित्र परिवार या संस्थाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठेंनी साहित्य, पोवाडे, लोकनाट्य, वगनाट्य, कथा, कादंबऱ्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या वेदनांना वाचा फोडत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिल्याचे प्रतिपादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शिक्षण, संघर्ष आणि संघटन हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकत असून अण्णाभाऊंचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शैलजैमिनी (सचिव), कृष्णा खोब्रागडे (उपाध्यक्ष), डॉ. राम कोल्हे, शालिनी सव्वालाखे, संगीता महल्ले, लीना पाटील, अजय पाटील, देवराव उजवणे, हिमांशू एकदारे, दिनकर धाबेकर, चंदन सुखदेवे, ज्ञानेश विदरे, शालिनी रणदिवे तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले असून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन









