– आदर्श शिक्षक गजानन चौधरी, माधुरी तायवाडे यांना अश्रुपूर्ण निरोप !
मोर्शी तालुका :- “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो समाज घडविणारा शिल्पकार असतो,” या उक्तीचा प्रत्यय दापोरी जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक गजानन चौधर, माधुरी तायवाडे यांच्या संपूर्ण सेवाकाळात आला. तब्बल अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निःस्वार्थपणे कार्य करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे, शिक्षणाची गुणवत्ता उंचावणारे आणि दापोरी जिल्हा परिषद शाळेला जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवून देणारे गजानन चौधरी, माधुरी तायवाडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शाळा फुलांनी सजविण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगते आणि भावपूर्ण गीतांद्वारे आपल्या लाडक्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गुरुजनांचा निरोप घेताना अश्रू अनावर झाले.
गजानन चौधरी यांनी आपल्या सेवाकाळात केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रप्रेम आणि माणुसकीचे संस्कार रुजविण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रभावी अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे दापोरी जिल्हा परिषद शाळेने गुणवत्ता, निकाल, उपक्रमशीलता आणि शैक्षणिक नवोपक्रमांच्या जोरावर जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण केली. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. त्यामुळे दापोरी जिल्हा परिषद शाळा ही परिसरातील पालकांसाठी विश्वासाचे केंद्र बनली.
समारंभात विविध मान्यवरांनी गजानन चौधरी व माधुरी तायवाडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून सरांच्या कार्याची आठवण सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या यशामागे सरांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे नमूद करत त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणार नाही, अशी भावना व्यक्त केली.
आपल्या मनोगतात गजानन चौधरी यांनी, “विद्यार्थ्यांचे यश हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे पारितोषिक आहे. शिक्षण ही समाज परिवर्तनाची सर्वात प्रभावी ताकद असून प्रत्येक विद्यार्थ्याने चांगला माणूस बनावे, हीच माझी अपेक्षा आहे,” असे भावनिक उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात गजानन चौधरी व माधुरी तायवाडे यांना भावपूर्ण निरोप दिला. संपूर्ण सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर चेहऱ्यावर आपल्या लाडक्या शिक्षकाविषयीचा अभिमान स्पष्ट दिसून येत होता.
ज्ञानदानाच्या अखंड सेवेला पूर्णविराम मिळाला असला, तरी गजानन चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर कोरलेले संस्कार, त्यांनी दिलेली प्रेरणा आणि त्यांनी घडविलेली असंख्य यशस्वी व्यक्तिमत्त्वे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख राहणार असून, दापोरी जिल्हा परिषद शाळेच्या इतिहासात त्यांचे नाव कायम सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
यावेळी कार्यक्रमाला सत्कार मूर्ती गजानन चौधरी, माधुरी तायवाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रगती सकर्डे, वृषाली अढाऊ, मंगेश कडू, माधुरी चौधरी, निखिलर वडतकर, श्रेया चौधरी, श्रुती चौधरी, नंदकुमार लुंगे, मुख्याध्यापक माधुरी घोंगडे, संध्या दारोकर, संकेत भोरे, काळे, भुक्ते, शिरभाते, साक्षी चौधरी, नितल श्रीवास, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.





