spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नेत्यांच्या ‘सल्युट’पेक्षा सामान्य माणसाचा सन्मान करा; आमदार नरेंद्र भोंडेकरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना झापले

हंसराज, भंडारा :- “प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा अधिकारी आणि जनतेच्या कामांकडे अधिक लक्ष द्यावे. तुम्ही नेत्यांचे खासगी कर्मचारी नाही, हे लक्षात ठेवा. आम्हाला ‘सल्युट’ नाही मारला तरी चालेल, पण कार्यालयात येणाऱ्या सामान्य माणसाला सन्मानाची वागणूक द्या,” अशा कडक शब्दांत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

भंडारा येथील हेमंत सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रशासकीय कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवत अधिकाऱ्यांना जाहीरपणे सुनावले.

आपल्या भाषणात आमदार भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “काही अधिकारी पत्रकारांनाही भेटत नाहीत, ही खेदाची बाब आहे. पत्रकार हे समाजाचा आरसा

असून ते वास्तव मांडण्याचे काम करतात. मात्र, एखादा रेती कंत्राटदार कार्यालयात आला की अधिकारी त्याला तातडीने वेळ देतात आणि सन्मानाने बसवतात, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना ताटकळत ठेवले जाते. ही पद्धत बदलली पाहिजे.”

समन्वय आणि पाठराखण महत्त्वाची वरिष्ठ अधिकारी कार्यक्षम असेल तरच खालची यंत्रणा नीट काम करते, असे नमूद करत त्यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवण्याचे आवाहन केले. “जर एखादा लोकप्रतिनिधी किंवा नेता विनाकारण एखाद्या

अधिकाऱ्याला धमकावत असेल, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांची खंबीरपणे पाठराखण केली पाहिजे. तरच तुम्ही सक्षम अधिकारी ठराल,” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

जनतेची जबाबदारी केवळ आमदारांची नाही मतदारसंघातील साडेतीन लाख जनतेची जबाबदारी केवळ आमदाराची नसून ती संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे आवाहन भोंडेकर यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना त्यांच्या दारातच मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मधुरा मदनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.