spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चार हजारांहून अधिक लाभांचे वाटप; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

हंसराज,भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दारातच विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री (गृह-ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म) तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

हेमंत सेलिब्रेशन, भंडारा येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २० हून अधिक शासकीय विभागांनी सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून दिल्या. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले, शासनाचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. महायुती सरकार लोकाभिमुख पद्धतीने कार्य करत असून शासनाचे निर्णय तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, तालुका व गावपातळीवरील अनेक वर्षांपासून प्रलंबित महसुली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला असून, गेल्या एका वर्षात घेतलेल्या विविध निर्णयांचा लाभ लाखो नागरिकांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी पुढेही प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भंडारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

आमदार परिणय फुके यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरातून जिल्ह्यातील नागरिकांना चार हजारांहून अधिक सेवांचा व लाभांचा वितरण करण्यात येत आहे. “सेवा हाच परमो धर्म” या भावनेतून नागरिकांना जास्तीत जास्त सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुढील वर्षी २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत आणखी भव्य स्वरूपात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी घरगुती कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र भोंडेकर होते. त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांशी सुसंवाद ठेवून लोकप्रतिनिधींसह समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

या शिबिरात विविध दाखले, प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना वितरित करण्यात आले.

Popular Articles