spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विशेष सहाय्यता योजना (एसएएस) संकेतस्थळ ठप्प; तातडीने सुरू करण्याची माजी सभापती उमेश रडके यांची मागणी

कामठी :- राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच दिव्यांग नागरिकांच्या विविध कल्याणकारी योजनांचे कामकाज चालविण्यासाठी वापरण्यात येणारे विशेष सहाय्यता योजना (एसएएस) संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने कामठी तालुक्यातील शेकडो गरजू लाभार्थ्यांची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. परिणामी शासनाच्या आधारावर उदरनिर्वाह करणारे निराधार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडले असून प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत माजी सभापती तथा कामठी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष उमेश रडके यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, संकेतस्थळ बंद असल्यामुळे नवीन अर्ज स्वीकारणे, लाभार्थ्यांची पडताळणी, मंजुरी प्रक्रिया, त्रुटींची दुरुस्ती, लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तसेच इतर सर्व संगणकीकृत सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही कामे मार्गी लागत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित महाआयटी विभागाशी तातडीने समन्वय साधून विशेष सहाय्यता योजना संकेतस्थळ त्वरित पूर्ववत सुरू करावे, तसेच भविष्यात अशा तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी उमेश रडके यांनी प्रशासनाकडे केली आहे.

निवेदन सादर करताना संजय गांधी निराधार समितीचे प्रांजल वाघ, विनोद बावनकुळे, नरेश मोहबे, चंद्रशेखर तूप्पट, सुभाष धुळसे, भगवान कोरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles