नागपूर :- राज्यातील बळीराजाला आणि ग्रामीण भागाला कृषी क्षेत्रासाठी अधिक मजबूत, अखंडित आणि गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या व महावितरणच्या कटिबद्धतेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ आणि आरडीएसएस योजनेंतर्गत महावितरणच्या सावनेर विभागांतर्गत येणाऱ्या 33 केव्ही केळवद उपकेंद्रात सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) नवीन अतिरिक्त 5 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर यशस्वीरीत्या आणि विनाविघ्न कार्यान्वित (Commission) करण्यात आला आहे.
केळवद उपकेंद्रातील या नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पण व कार्यान्विती सोहळ्यास नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक पायाभूत सुविधा (Infra) विभागाच्या अधीक्षक अभियंता दिपाली माडेलवार, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत व नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
केळवद उपकेंद्रात नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील वीज भार व्यवस्थापन (Load Management) आता पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी व अचूक होणार आहे. विशेषतः शेतीपंपांना सुरळीत, स्थिर आणि हवी तेवढी वीज मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे सुकर झाला आहे. वीज दाब कमी होणे किंवा वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या आता इतिहासजमा होणार असून, केळवद परिसरातील वीज वितरणातील ताण कमी होण्यास मदत मिळणार असल्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे संपूर्ण काम ‘मे. पॉलिकॅब इंडिया लिमिटेड’ या एजन्सीमार्फत उच्च गुणवत्तेसह आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. एजन्सीच्या प्रतिनिधींनी व तांत्रिक पथकाने दाखवलेली तप्परता आणि अचूकता यामुळेच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला आहे.
या नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या यशस्वी पूर्ततेमुळे केळवद परिसरातील वीज पायाभूत सुविधा आता अत्यंत भक्कम झाली असून, भविष्यातील वाढती औद्योगिक व कृषी ग्राहकांच्या विजेची मागणी महावितरण पूर्णपणे सज्ज असल्याचे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. या विकासकामामुळे परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला एक नवी व सकारात्मक दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





