spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वडोदा पोलिसांची धडक कारवाई; २१ गोवंशांची सुटका, ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कामठी :- कामठी तालुक्यातील वडोदा पोलिसांनी गोवंश जनावरांची तस्करी करून कत्तलीसाठी वाहतूक करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर धडक कारवाई करत सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत २१ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून चार वाहनांसह एकूण ५७ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई गतरात्री करण्यात आली.

ही कारवाई नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल महस्के आणि कन्हान उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा पोलिसांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी वडोदा चौक कुही फाटा येथे नाकाबंदी सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत आसलवाडा शिवारात काही व्यक्ती गोवंश जनावरांना वाहनांमध्ये भरून कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून कारवाई केली.

या प्रकरणात विक्की सुरेश गजभिये (३४),रा अंबागड तालुका तुमसर, शिवचरण उरकूड हटवार (५५),रा अंबागड अजित विनायक निर्वाण (२१),रा लाखनी, फैजान इरफान कुरेशी (३७)रा भाजीमंडी,कामठी,नूर मोहम्मद कुरेशी वय 39 वर्षे रा भाजीमंडी कामठी, सचिन मरकाम वय 46 वर्षे रा बाजार चौक वडोदा असे एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत २१ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार वाहनांसह ५७ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वडोदा पोलीस करीत आहेत.

Popular Articles