spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बीएलओ व नगरसेवकांनी समन्वयाने एसआयआरचे काम करावे – महापौर निता ठाकरे यांचे आवाहन

– कचरा गाड्यांवरून एसआयआरबद्दल ध्वनीफितीने जनजागृती करावी

नागपूर :-  मतदार यादीचे विशेष सघन पुनर्निरीक्षण (एसआयआर) काम त्वरित पूर्ण करण्याची आवश्यकता असून, यासाठी बीएलओ व नगरसेवकांनी समन्वयाने व सहकार्याने काम करावे, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे होत्या. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर  लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक मनोज साबळे, नगरसेवक विवेक निकोसे, नगरसेवक शेषराव गोतमारे, नगरसेवक किरण मनपिया उपस्थित होते. या बैठकीला शहरातील बीएलओ व सर्व राजकीय पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.

शहरातील एसआयआरचे काम पुढील १० दिवसात पूर्ण करावयाचे आहे, हे उद्दीष्ट ठेऊन सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे. बीएलओची जबाबदारी ही प्राथमिक आहे. यासाठी बीएलओने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या कामासाठी शहरातील नगरसेवक मदत करतील. नगरसेवकांनी यासाठी मदत करणे हे बीएलओसाठी पूरक ठरणार आहे. हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे काम नाही. सर्व पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही बीएलओची आहे. पुढील १० दिवसात ही यादी १०० टक्के पूर्ण झाली पाहिजे. बीएलओंना मदत करण्याच्या संदर्भात नगरसेवकांना आवाहन केले जाईल, असेही महापौर ठाकरे यांनी सांगितले.

कचरा गाड्यांवरून माहिती द्या – महापौर

मनपाच्या कचरा संकलन करणार्या कचरा गाड्यांवरून एसआयआरच्या संदर्भात जनजागृती करणारी माहिती ध्वनीफितीद्वारे देण्यात यावी, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी दिले. कचरा गाड्या या घरोघरी जात असल्याने नागरिकांना या संदर्भात माहिती मिळेल व जनजागृती होण्यास मदत होईल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.