spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी विद्यार्थिनीच्या पुढाकारातून तोंडली शाळेतील विद्यार्थ्यांना पाटी व लेखणीचे वाटप 

किशोर साहू, मौदा :- “जुनं ते सोनं” या संकल्पनेला उजाळा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडली येथील माजी विद्यार्थिनी अर्चना धोतरे यांनी सोमवार (ता. 3 ऑगस्ट) ला शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पाटी व लेखणी भेट देऊन शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पुन्हा एकदा पाटी आली असून हस्ताक्षर सुधारणा, लेखनकौशल्य विकास तसेच अध्ययन अधिक प्रभावी व आनंददायी होण्यास मदत होणार आहे. माजी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या अशा शैक्षणिक साहित्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर पडत असून विविध शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसही मोठी चालना मिळत आहे.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. अनुराधा धुर्डे तसेच सहाय्यक शिक्षक निलेश जाधव यांनी अर्चना धोतरे यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. आपल्या मातृशाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे हा उपक्रम इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अनिता धोतरे व लक्ष्मी धोतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी माजी विद्यार्थिनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

Popular Articles