– नागपूर विभागात प्रथम क्रमांक; लोकसहभाग, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी उपक्रमांना मिळाली राज्यस्तरीय दाद
कामठी :- स्वच्छता हीच खरी सेवा आणि लोकसहभाग हाच विकासाचा पाया असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत तरोडी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ अंतर्गत आयोजित विभागस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे.
स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त गाव, लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या विविध निकषांवर विभागीय पडताळणी समितीने केलेल्या सखोल मूल्यांकनानंतर तरोडी ग्रामपंचायतीची अव्वल निवड करण्यात आली.
तरोडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदान, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेची जनचळवळ उभी करून ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला. या उल्लेखनीय यशामागे गटविकास अधिकारी पीयूष डोंगरे, सरपंच आरती चिकटे, उपसरपंच ससारिका सनकोडे, ग्रामपंचायत अधिकारी उमेश धावडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अथक परिश्रम मोलाचे ठरले.
या दिमाखदार यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे तसेच विभागीय उपआयुक्त (विकास) विवेक इलमे यांनी तरोडी ग्रामपंचायतीचे विशेष अभिनंदन करत ही कामगिरी संपूर्ण विभागातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.
तरोडी ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक यशामुळे कामठी तालुक्यासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा गौरव वाढला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय स्तरातून ग्रामपंचायतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





