spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पहिल्याच पावसात देवलगाव–कवठा रस्त्याला लागले ग्रहण

पंकज परशुरामकर , प्रतिनिधी

नवेगाव बांध :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव–कवठा–कालीमाती–प्रतापगड–घोटणगाव हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग यावर्षीच्या पहिल्याच पावसात धोकादायक बनल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावरील पूल, नाले व अनेक ठिकाणी रस्त्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

देवलगाववरून कवठ्याकडे जाताना पहिल्याच नाल्यावरील पुलाला दोन मोठी भगदाडे पडली असून त्यामुळे कधीही गंभीर अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता वाहून गेला असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

यापुढे डोंगरगाव तलावाच्या चांदव्यातून येणाऱ्या पाण्याच्या नाल्यावर असलेल्या पुलावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे हा पूलही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवलगाव ते डोंगरगाव आणि पुढे कवठ्यापर्यंत संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

विशेष म्हणजे, देवलगाव ते डोंगरगाव हा रस्ता जिल्हा परिषदेकडे असून त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. तर डोंगरगाव ते कवठा–कालीमाती–प्रतापगड–गोटणगाव हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, अर्जुनी मोरगाव यांच्या अखत्यारीत येतो. दोन विभागांच्या सीमारेषेत अडकलेल्या या महत्त्वाच्या मार्गाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी तसेच प्रतापगड व घोटणगाव परिसरातील पर्यटनस्थळांना आणि धार्मिक स्थळांना भेट देणारे पर्यटक व भाविक प्रवास करतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांनी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून तातडीने भगदाडे बुजवावीत, पूल सुरक्षित करावेत तसेच संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.