spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे अधिक गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प

– मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

– मुंबई ३.० साठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा एकात्मिक मास्टर प्लॅन

मुंबई :- मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश आहे. नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे. या क्षमतेचा प्रभावी उपयोग करून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे. यातून तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीए आणि टेमासेक सुरबाना जुरोंग व मॅपलट्री, सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त तथा रायगड-पेन ग्रोथ सेंटरचे अध्यक्ष पी.वेलारसू, टेमासेकचे अध्यक्ष पियुष गुप्ता, टेमासेक पोर्टफोलिओ विकास प्रमुख (आशिया ऑपरेशन्स) दिनेश खन्ना, सुरबाना जुरोंगचे प्रमुख अविनाश मिश्रा, मॅपलट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय कुमार सिंग, रायगड-पेन ग्रोथ सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव मित्तल, रायगड-पेन ग्रोथ सेंटरचे संचालक के. व्ही. ब्रह्माजी राव व संबंधित यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागीदारीचे स्वागत करताना सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रायगड परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि ‘थर्ड मुंबई’ अर्थात मुंबई 3.0 च्या विकासासाठी सिंगापूरमधील नामांकित संस्था आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबत करण्यात आलेले करार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी शासनाने आखलेले नियोजन आता प्रत्यक्षात येत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे देश-विदेशातील गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास वाढत आहे. सिंगापूरला शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाची शहरे विकसित करण्याचा मोठा अनुभव आहे. या अनुभवाचा लाभ महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल.

मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्तारासोबत भविष्यात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई या नव्या विकासकेंद्रांचा उदय होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि एमएमआर मधील प्रस्तावित विकास केंद्रांची एकात्मिक सांगड घालून भविष्यातील आर्थिक विकासासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित विस्तार, रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीए, आरपीजीसीएल आणि संबंधित सर्व संस्थांचे या भागीदारीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले. झालेल्या सामंजस्य करारांचे आणि प्रस्तावित प्रकल्पांचे काम जलदगतीने पुढे नेऊन त्याचे प्रत्यक्ष परिणाम जमिनीवर लवकरात लवकर दिसायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा विकास प्रकल्प

रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकरांच्या मिश्र-वापर विकास प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पामध्ये मॅपलट्रीकडून विकासासाठी आवश्यक भांडवली व कार्यकारी भांडवल गुंतवणूक, मूल्यनिर्मिती, देश-विदेशातील गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या व्यवहारातून रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १.१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक परकीय थेट गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. यामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

सुरबाना ज्युराँगकडे प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी

रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेडने सुरबाना ज्युराँग यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा करार केला आहे. सुरबाना ज्युराँगने यापूर्वीच रायगड-पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या टप्प्यात संस्थेचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कंत्राटदाराकडून करण्यात येणाऱ्या कामांचे परीक्षण व मंजुरी, डिझाईन, अभियांत्रिकी आराखडे, रेखाचित्रे, कागदपत्रे आणि अन्य कामांचे परीक्षण करण्याची जबाबदारी सुरबाना ज्युराँग पार पाडणार आहे. तसेच बांधकामाची गुणवत्ता, कामाची प्रगती, करारातील अटींचे पालन, कामाच्या प्रगतीचे व टप्प्यांचे प्रमाणन, कामगिरीचे निरीक्षण आणि आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांची शिफारस करण्याचे कामही सुरबाना ज्युराँग करणार आहे.

मुंबई 3.0 साठी 324 चौ.कि.मी. क्षेत्राचा मास्टर प्लॅन

‘थर्ड मुंबई’ अर्थात मुंबई 3.0 च्या नियोजित विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जानेवारी 2026 मध्ये स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान सुरबाना ज्युराँग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात पातळीवर सामंजस्य करार करण्यात आला.

या करारानुसार मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास केंद्रांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये थर्ड मुंबई/मुंबई 3.0चा समावेश आहे. मुंबई 3.0च्या नियोजनासाठी सुमारे 324 चौ.कि.मी. क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून जमिनीचा वापर, वाहतूक व दळणवळण व्यवस्था, गृहनिर्माण, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रे, सामाजिक पायाभूत सुविधा, तसेच अन्य नागरी पायाभूत सुविधांचे एकात्मिक नियोजन करण्यात येणार आहे. नियोजित विकास टप्प्याटप्प्याने आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी या आराखड्याची मदत होणार आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकासाला गती

रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि मुंबई 3.0 च्या विकासासाठी एमएमआरडीए आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी संस्थांमध्ये होत असलेली भागीदारी ही महाराष्ट्राच्या शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी एमएमआरडीए कडून विविध नवीन क्षेत्रांचा विकास करण्यात आला आहे. आता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ संस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येत असल्याने भांडवली गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे नियोजन आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभव यांचा लाभ महाराष्ट्राला मिळणार आहे.

मॅपलट्री आणि सुरबाना ज्युराँगसारख्या संस्थांसोबतची भागीदारी रायगड-पेण परिसराच्या विकासाला वेग देईल. या माध्यमातून गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, उद्योग-व्यवसाय आणि आधुनिक नागरी सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.