spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘तुका झाला पांडुरंग’ : सुरेल अभंग प्रस्तुतीने रसिक मंत्रमुग्ध

नागपूर :- आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘तुका झाला पांडुरंग’ या सुरेल अभंग प्रस्तुतीला नागपूरकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायंटिफिक सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांच्या सुमधुर सादरीकरणातून संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. सुप्रसिद्ध गायक डॉ. साधना शिलेदार आणि डॉ. राहुल एकबोटे यांनी आपल्या भावपूर्ण आणि सुरेल गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वारकरी संप्रदायाच्या भजनाचा ठेका, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधील आध्यात्मिक संदेश आणि वाद्यवृंदाची उत्कृष्ट साथ यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. श्रोत्यांच्या आग्रहास्तव डॉ. राहुल एकबोटे यांनी सादर केलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाला उत्स्फूर्त दाद मिळाली, तर डॉ. साधना शिलेदार यांनी भैरवी रागातील ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता’ या अभंगाच्या सादरीकरणातून रसिकांना भावविवश केले. कार्यक्रमात एकूण १५ अभंगांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. वृषाली शिलेदार यांची होती. कार्यक्रमाचे संयोजन मानसी देशपांडे आणि डॉ. वंदना कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्यब्रह्मवादिनीच्या मुख्य संचालिका आरती महाजन आणि जयश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात अंजली देशपांडे यांनी संस्थेच्या २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रांत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याची माहिती दिली. राज्यभरातील सुमारे ३० हजार महिलांना संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्याचे त्यांनी नमूद केले. अभंग प्रस्तुतीदरम्यान स्नेहा शिनखेडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आध्यात्मिक आशय प्रभावी निवेदनातून उलगडला. गायकांना संवादिनीवर श्रीकांत पिसे, तबल्यावर निखिल मडावी, पखावजवर आशीष गायधन, तसेच सहतालवाद्यात गजानन रानडे आणि सोहम रानडे यांनी उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मानसी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवानी दिवाळे, हेमांगी जोशी, शिल्पा नाईक, कविता मोहरील, प्राची कुलकर्णी, डॉ. ज्योती शिवलकर आणि सुनीती मोहरील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सर्वांसाठी निःशुल्क असलेल्या या कार्यक्रमाला अभंगसंगीत रसिक, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, संगीत आणि संत साहित्याचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थित रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Popular Articles