spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बसपात शिस्तीचा ‘वज्रप्रहार’! किशोर गेडाम सहा वर्षांसाठी निलंबित

– पक्षविरोधी कारवाया, वरिष्ठ नेतृत्वाचा अवमान आणि शिस्तभंगाचा ठपका; ‘कारवाईच बेकायदेशीर’ म्हणत गेडाम यांचा जोरदार पलटवार

कामठी :- बहुजन समाज पार्टी (बसपा) महाराष्ट्र प्रदेशात पक्षशिस्तीच्या मुद्द्यावर मोठी खळबळ उडाली असून, प्रदेश नेतृत्वाने कठोर भूमिका घेत किशोर गेडाम यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया, वरिष्ठ नेतृत्वाचा अवमान, अधिकृत धोरणाविरोधात सार्वजनिक वक्तव्ये, सोशल मीडियावर पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आणि वारंवार शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बसपा प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या निर्देशानुसार तसेच प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, नागोराव जयकर आणि पृथ्वीराज शेंडे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात गेडाम यांचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील सहा वर्षे त्यांना पक्षाच्या कोणत्याही बैठकीत, कार्यक्रमात किंवा संघटनात्मक उपक्रमात सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पक्षाने आपल्या निवेदनात, “कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि पक्षहित सर्वोच्च असून, त्याविरोधात जाणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई अपरिहार्य आहे,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील बसपा वर्तुळात मोठी राजकीय खळबळ उडाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘हे निलंबनच बेकायदेशीर’; गेडाम यांचा पलटवार

दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना किशोर गेडाम यांनी निलंबन फेटाळून लावत गंभीर आरोप केले. “निलंबनपत्रावर स्वाक्षरी करणारे तिन्ही महासचिवच पक्षविरोधी काम करणारे आहेत. मी कधीही पक्षशिस्त मोडलेली नाही,” असा दावा त्यांनी केला.

गेडाम म्हणाले, “नागोराव जयकर, मंगेश ठाकरे आणि पृथ्वीराज शेंडे यांनी मागील नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे नुकसान केले. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रात पक्षाची ताकद कमी करण्याचे काम त्यांनीच केले आहे. मी नेहमी पक्षशिस्तीचा कट्टर समर्थक राहिलो असून, पक्षशिस्तीच्या मुद्द्यावरच माझे त्यांच्याशी मतभेद होते.”तसेच, “हे पत्र अधिकृत नसून प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांची मंजुरी त्याला नाही. त्यामुळे या पत्राला कोणतीही कायदेशीर किंवा संघटनात्मक वैधता नाही,” असा दावाही त्यांनी केला.

राजकीय वर्तुळाचे लक्ष या संघर्षाकडे

बसपा प्रदेश नेतृत्वाच्या कठोर कारवाईनंतर आणि किशोर गेडाम यांच्या प्रतिआरोपांमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. या प्रकरणाचे आगामी काळात काय राजकीय परिणाम होतात, याकडे बसपा कार्यकर्त्यांसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

Popular Articles