spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा हादरले! चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनसागर रस्त्यावर; आरोपीला फाशी देण्याची मागणी

– भंडारा शहर कडकडीत बंद, विद्यार्थी आणि महिलांचा संताप

– प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे पोलीस महानिरीक्षकांचे आश्वासन

प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहरातील एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या नराधम कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. ‘न्याय हवा’, ‘आरोपीला फाशी द्या’ अशा घोषणांनी भंडारा शहर दणाणून गेले होते. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘भंडारा बंद’ला व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

घटनेचा थरार आणि जनक्षोभ

६ ऑगस्ट रोजी शहरातील आंबेडकर वार्डातील एका समाज भवनाच्या स्वच्छतागृहात ३० वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीने स्वतःला इजा करून घेतल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयाला घेराव घातला होता. तणाव वाढल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपीला मध्यरात्री नागपूरला हलवले. भव्य निषेध मोर्चा आणि शाळा-महाविद्यालये बंद आज, ७ ऑगस्ट रोजी सकाळी गांधी चौकात हजारो नागरिक जमा झाले. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता. शहरात महिला आणि मुली असुरक्षित असल्याची भावना यावेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि शाळा-महाविद्यालयांनी स्वतःहून बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी भंडाऱ्याच्या जनतेने केली आहे. सद्यस्थितीत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

पोलीस महानिरीक्षक या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी आंदोलकांना आश्वस्त केले की, “या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ११ पोलिसांचे विशेष पथक नेमले आहे. येत्या ७ ते ८ दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले जाईल. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतील.”

Popular Articles