प्रतिनिधि, भंडारा मोहगाव खदान :- तुमसर तालुक्यातील मोहगाव खदान ग्रामपंचायतीच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने येथील सरपंच मालती ताई रामकृष्ण डडेमल यांना अखेर आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी याप्रकरणी ऐतिहासिक निकाल देत डडेमल यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवले आहे.
काय आहे प्रकरण? पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या मोहगाव खदान ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे १५०० असून, येथे सरपंचासह एकूण ८ सदस्य आहेत. वार्षिक ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न असलेल्या या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मालती ताई डडेमल कार्यरत होत्या. निवडणूक नियमांनुसार, राखीव जागेवरून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला ठराविक कालावधीत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, मालती ताई डडेमल यांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्या पदावर टांगती तलवार होती.
या संदर्भात रिकेश विनोद मेश्राम यांनी प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल करून डडेमल यांच्या अपात्रतेची मागणी केली होती. या प्रकरणाची सखोल सुनावणी झाल्यानंतर, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी कायद्यातील तरतुदींचा आधार घेत मालती ताई डडेमल यांना सरपंच पदावरून अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे तुमसर तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पदावरून पायउतार व्हावे लागते, हा संदेश या निकालातून स्पष्ट झाला आहे. मोहगाव खदान ग्रामपंचायतीच्या आगामी राजकीय समीकरणांकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





