spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी नराधमाला फाशी द्या; भाजपा जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

– खटला ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवून जलद निकालासाठी धाडले निवेदन

प्रतिनिधि भंडारा :- भंडारा शहरात ६ ऑगस्ट २०२६ रोजी एका तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष आणि जघन्य लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. या प्रकरणातील दोषीला कोणतीही दया न दाखवता फाशीचीच शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून जलदगतीने निकाल लावावा, अशी आग्रही मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आशिष (आशू) गोंडाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात संतापाची लाट; पारदर्शक तपासाची गरज दिनांक ६ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांमुळे समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने, निष्पक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने करून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कलमान्वये कारवाई करण्यात यावी, असे आशिष गोंडाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

‘नरसापूर’ प्रकरणाप्रमाणे जलद कारवाई व्हावी ज्याप्रमाणे नरसापूर येथील गंभीर प्रकरणात जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया राबवून न्याय देण्यात आला, त्याच धर्तीवर भंडारा येथील या प्रकरणालाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. सदर खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दैनंदिन सुनावणीच्या माध्यमातून आरोपीस फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सक्षम आणि ठाम भूमिका घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

पीडित कुटुंबाला आधार देण्याची मागणी केवळ कठोर शिक्षेवर न थांबता, पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यभर बालकांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज गोंडाणे यांनी व्यक्त केली आहे.

सदर निवेदनाच्या प्रतिलिपी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय फुके आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या वतीने या संवेदनशील प्रकरणात स्वतः लक्ष घालून पीडितेला न्याय मिळवून देण्याची नम्र अपेक्षा आशिष गोंडाणे यांनी व्यक्त केली आहे.

Popular Articles