नागपूर :- वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण करूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रशिक्षित उमेदवारांनी आपल्या रोजगाराच्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागणीसाठी गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत, WCL मुख्यालय, नागपूर येथे भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवूनही मोठ्या संख्येने प्रशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे WCL व्यवस्थापनाने अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आवश्यक परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी, WCL CMD कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, SDM कार्यालय, DCP कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सदर पोलीस ठाणे तसेच गिट्टीखदान पोलीस ठाणे येथे आंदोलना संदर्भात परवानगी असून या आंदोलनाच्या माध्यमातून WCL मध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, प्रशिक्षित उमेदवारांच्या रोजगाराच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि त्यांच्या भवितव्याचा सकारात्मक विचार करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, WCL अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या रोजगाराच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात केले जात आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी तसेच परवानगी प्रक्रिये दरम्यान रिया येळणे, रविना गेडाम, स्नेहल चव्हाण, अंकिता केनवरीया, ऐश्वर्या मेश्राम, गोपाल हंबर्डे, दिनेश राऊत, आशिष नावडे, मोनिका मून, हेमलता माचियाँ, सूर्यकांत वांढरे, गणेश ताजणे, अंकुश कावे, रोहन सोनटक्के, निखिल सोनटक्के, यश सावरकर, ऋषिकेश नीतनावते, सौरभ मोहतकर, वृषान अली, विपुल काशीवार आणि कुणाल वऱ्हाटे यांच्यासह अनेक उमेदवार सहभागी आहेत. “आम्ही एक आहोत – रोजगार आमचा हक्क आहे” या भूमिकेसह WCL अप्रेंटिसशिप पूर्ण उमेदवार 13 ऑगस्ट 2026 रोजी, आपल्या रोजगाराच्या मागणीसाठी एकजुटीने आवाज उठवणार आहेत. सर्व पात्र व प्रशिक्षित उमेदवारांनी गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी WCL मुख्यालय, नागपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश ताजणे आणि भारतीय अप्रेंटिस संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील निर्मलकर यांनी केले आहे.








