spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समृद्ध मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृतीला जागतिक व्यासपीठ – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

– दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद

नवी दिल्ली :-  मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे काढले.

दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. या भव्य महोत्सवाचे उद्घाटन काल उत्साहात पार पडले.

महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह ‘देऊळ बंद २’ चे दिग्दर्शक प्रवीण तरडे, सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर यांची विशेष उपस्थिती होती. या दोन्ही दिग्दर्शकांनी ही प्रेक्षकांशी संवाद साधला .

दिल्लीत मराठी चित्रपटांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त करताना मंत्री सामंत यांनी महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरा दिल्लीकरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. दिल्लीत भव्य स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना करून ते म्हणाले, या उत्सवाच्या माध्यमातून दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अधिक व्यापक आणि प्रत्यक्ष दर्शन घडेल, तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठसा राजधानीत अधिक ठळकपणे उमटेल. मराठी चित्रपट केवळ मुंबई आणि पुण्यापुरता मर्यादित न ठेवता देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विशेषतः तंजावर आणि बडोदा यांसारख्य मराठी संस्कृतीशी ऐतिहासिक नाते असलेल्या शहरांमध्येही मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सुचवले.

देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीची दखल घेतली जावी, यासाठी चित्रपट महोत्सवांसह विविध सांस्कृतिक उपक्रम देशभर तसेच परदेशात आयोजित करण्याची गरज आहे. मराठी संस्कृतीची व्यापक ओळख निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी आणि मराठी भाषेच्या कार्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहेत. परदेशातील मराठी भाषिकांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या प्रयत्नांना शासनाकडून पूर्ण पाठबळ देण्यात येत असून प्रत्येक राज्यात मराठी माणसाची ताकद आणि मराठी भाषेचा प्रभाव अधिक दृढ व्हावा, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

दरम्यान, या चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. यादरम्यान ‘तुंबाडची मंजुळा’, ‘घुबाड कुंड’, ‘स्थळ’ आणि ‘फुलवंती’ हे दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांसाठी दाखवण्यात आले. राजधानीतील मराठी बांधवांनी या महोत्सवाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने लावलेली उपस्थिती अत्यंत कौतुकास्पद असून, मराठी चित्रपट, भाषा आणि संस्कृतीला राजधानी दिल्लीच्या सांस्कृतिक पटावर मिळणारे हे स्थान निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले.

दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे विवेक गार्गे यांनी यावेळी मंत्री सामंत यांचा सत्कार केला.

सकाळच्या संत्रात फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. मिलिंद दामले यांनी चित्रपट अभ्यासाकांचे विशेष सत्र घेतले. त्यात काही महत्वपूर्ण माहितीपटांचे प्रसारण करण्यात आले.

Popular Articles