-ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याला मान्यवरांकडून भावपूर्ण आदरांजली
नागपूर :- काही माणसे काळाच्या पडद्याआड जातात. पण त्यांची लेखणी आणि त्यांनी समाजासाठी केलेले कार्य पुढेही जिवंत राहते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढता येत नाही. लक्ष्मणराव जोशी, टी.बी.गोल्हर, विराग पाचपोर आणि मिलिंद ठेंगडी हे पत्रकारितेतील तपस्वी होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, असे भावपूर्ण प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

क्रांतिदिनी, ९ ऑगस्ट रोजी टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स येथे चार दिवंगत ज्येष्ठ पत्रकारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त शोकसभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा राहुल पांडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, या चौघांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ पत्रकारितेला दिला.
दिवंगत चार पत्रकारांच्या पत्रकारितेतील विविध पैलू आणि त्यांच्या आयुष्यातील निवडक घटनांना ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, विश्वास इंदूरकर, जोसेफ राव, आमदार संजय भेंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जावंधिया, किशोर तिवारी, कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील, भाजपाच्या प्रगती पाटील, अँड. प्रकाश मेघे आणि डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उजाळा दिला. प्रेस क्लब व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविकातून, या ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याची नोंद पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगितले. शोकसभेचे संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले. यावेळी गोल्हर, जोशी, पाचपोर कुटुंबीय, तसेच महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अतुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार शिरीष बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी, विवेक पुराडभट, चंद्रशेखर जोशी, डॉ.राम ठाकूर, शिव शाहू, अरुण आसटकर, सुनील चोखारे, चंद्रकांत शेन्डे, रंजित देशमुख, देवराव प्रधान, शेखर सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





