spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुही पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाची कमतरता; वाढत्या गुन्हेगारीपुढे पोलीस यंत्रणा हतबल?

कुही :- तालुक्यात अलीकडच्या काळात घरफोडी, चोरी, अपघात, अवैध वाहतूक, जुगार, गोवंश तस्करी अशा विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कुही पोलीस ठाण्यातच मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कुही पोलीस ठाण्यासाठी एकूण ६२ पदे मंजूर असताना केवळ २८ कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच ३३ पदे रिक्त असून जवळपास निम्म्या मनुष्यबळावर संपूर्ण तालुक्याचा कारभार चालवावा लागत आहे. नायक पोलीस अमलदारांची १४, पोलीस अमलदारांची १५ तसेच इतर महत्त्वाची पदेही रिक्त असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

कुही तालुक्यातील प्रत्येक गुन्ह्याची माहिती घेणे, घटनास्थळी तातडीने पोहोचणे, पंचनामा करणे, तपास करणे, रात्रीची गस्त, वाहतूक नियंत्रण, न्यायालयीन कामकाज, सण-उत्सवांचा बंदोबस्त, व्हीआयपी दौरे, आंदोलने आणि कायदा-सुव्यवस्था राखणे अशा असंख्य जबाबदाऱ्या याच मोजक्या कर्मचाऱ्यांवर आहेत. परिणामी, प्रत्येक ठिकाणी वेळेवर आणि प्रभावी पोलीस उपस्थिती ठेवणे कठीण होत आहे.

मांढळ येथील बंद घर फोडून झालेल्या चोरीच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, पोलीसच कमी असतील तर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण कसे मिळवायचे? ग्रामीण भागात नियमित गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास चोरट्यांचे धाडस वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

यामध्ये पोलिसांचा दोष काढण्यापेक्षा त्यांना आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर वाढता कामाचा ताण पडत असून त्याचा परिणाम तपासाच्या गतीवर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुहीसारख्या मोठ्या ग्रामीण तालुक्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे, आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि रात्रीच्या गस्तीसाठी स्वतंत्र पथके निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा गुन्हेगारांसाठी संधी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी असुरक्षिततेची भावना अधिक वाढत जाईल.

Popular Articles