spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

– 33 हजारांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

मुंबई :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून राज्यातील 33 हजार 281 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार विविध संवर्गनिहाय मंजूर संच निश्चित करण्यात आले आहेत. इयत्ता चौथीसाठी एकूण 16 हजार 693, तर इयत्ता सातवीसाठी विविध संवर्गांतील 16 हजार 588 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी व प्रमाणपत्रे संबंधित शाळांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अंतिम निकाल, गुणपत्रक व प्रमाणपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अंतिम निकाल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या, जिल्हानिहाय शाळा सांख्यिकी माहिती तसेच संवर्गनिहाय कटऑफ गुणांची माहिती https://mscepune.in आणि https://२०२६-२.puppssmsce.in संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. तथापि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती भरल्यानंतरच उपलब्ध होईल.

मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षेस बसलेले विद्यार्थी, विहित वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी, शुल्क न भरलेले विद्यार्थी तसेच नियमानुसार पात्रता पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आलेला नाही. ऑनलाइन अर्जामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पात्रता रद्द करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती रकमेबाबतची कार्यवाही शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर करण्यात येणार असून गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची शिफारस त्यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

Popular Articles