मुंबई :- खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. राज्यात कृषी निविष्ठांच्या लिंकिंगला मनाई आहे, मात्र अनेक ठिकाणी युरिया, डीएपी, रासायनिक खतांचे सक्तीने लिंकिंग केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. लिंकिंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना कृषी, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, कामगार, विधि व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.
मंत्रालयातील दालनात आयोजित नागपूर जिल्ह्यातील युरिया, डीएपी खतांसोबत रासायनिक खतांच्या सक्तीने लिंकिंग विक्रीबाबत बैठकीत राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, निविष्ठा व गुणनियंत्रणचे संचालक सुनील बोरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तर दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कृषी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने नागपूर विभागात १३३ गुणनियंत्रण निरीक्षक तर ६० तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. खत खरेदी करताना लिंकिंगचा प्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० किंवा 9822446655 वर संपर्क साधावा. शिवाय वितरक कंपनी, विक्रेते, उत्पादक यांच्यात लिंकिंगबाबत मिलीभगत असल्याचे आढळून असल्यास कृषी विभागाने कारवाई करावी. युरिया, खते, बियाणे याचे वितरण कृषी अधिकाऱ्यांनी सुरळित करावे. कृषी निविष्ठांची मागणी शेतकरी पोर्टलवर सध्या ऑनलाईन सुरू आहे, मात्र ही प्रक्रिया ऑफलाईनही सुरू ठेवावी. जेणेकरून शेतकऱ्यांना विनाअडथळा थेट खते मिळण्यास सोईचे जाईल, यापध्दतीने नियोजन करावे.
नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने अधिकाऱ्यांना जबाबदारी ठरवून द्या, धाडपथके निश्चित करा. शेतकऱ्यांना राज्यस्तरावर तक्रारी करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्या. याबाबत १५ ऑगस्टपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामसभेत याबाबत वाचन करावे, अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.
झटका मशिनबाबत योग्य लाभार्थी निवड करावी. वन्य प्राणी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. झटका मशिन वाटपमध्ये गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
युरिया, खते आणि लिंकिंगबाबत नागपूर विभाग सज्ज
नागपूर विभाग पातळीवर एक तर जिल्हा पातळीवर सहा अशी एकूण सात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. नागपूर विभागात १० जून २०२६ अखेर नागपूर जिल्ह्यात १३३५, वर्धा १३२०, भंडारा ६७०, गोंदिया १०१३, चंद्रपूर १०४४ व गडचिरोली ७०९ असे एकूण ६१९१ खत विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघनप्रकरणी रासायनिक खताचे नागपूर जिल्ह्यात २८, वर्धा जिल्ह्यात २६, भंडारा जिल्ह्यात ४०, गोंदिया जिल्ह्यात ३५, चंद्रपूर जिल्ह्यात ४० व गडचिरोली जिल्ह्यात १४, असे एकूण १८३ निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर नागपूर जिल्ह्यात तीन, वर्धा जिल्ह्यात आठ, भंडारा जिल्ह्यात दोन, गोंदिया जिल्ह्यात चार आणि चंद्रपूर जिल्ह्यात चार असे २१ निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच कायद्याचे उल्लंघन प्रकरणी रासायनिक खताचे १८५ विक्री बंद आदेश देण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यामध्ये ७ ऑगस्ट रोजी एचयूआरएल कंपनीद्वारे युरिया खतासोबत अमोनियम सल्फेट या खताची लिंकिंग करण्यात येत असल्यासंदर्भात नागपूर अॅग्रो डीलर असोसिएशन, नागपूर यांचेकडून तक्रार प्राप्त झाली आहे. यामुळे ८ ऑगस्ट २०२६ रोजी गणेशपेठ पोलीस स्टेशन, नागपूर येथे एचयूआरएल या कंपनीविरोधात तक्रार दिली आहे.
बैठकीद्वारे लिंकिंग न करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत तर खत विक्री केंद्रावर “लिंकिंगला मनाई करण्यात येत आहे, ‘लिंकिंग ला नाही म्हणा’ याबाबतचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.





