चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे क्रांतिदिन कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मारक, सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे पार पडला. महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली व ध्वजारोहण करण्यात आले.
क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ असे म्हणतात. ९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली होती.

यावेळी आयुक्त अकुनूरी नरेश,सहायक आयुक्त सचिन माकोडे, अनिलकुमार घुले,राहुल पंचबुद्धे,डॉ.अमोल शेळके यांनी शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. कार्यक्रमास मनपा अधिकारी कर्मचारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच पालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थ्यांतर्फे ‘ क्रांती दिन अभिवादन रॅली ‘ काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मनीषा नैताम यांनी केले.





