spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खाप्यात उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिवस, बिरसा मुंडा स्मारकापासून प्रभात फेरी; आदिवासी संस्कृती व परंपरांचे घडले मनोहारी दर्शन

खापा, वार्ताहर :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त खापा शहरातील आदिवासी बांधवांच्या वतीने रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, परंपरा, रितीरिवाज आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात रविवारी (दि. ९) सकाळी ९ वाजता माईन गेटसमोरील बिरसा मुंडा स्मारक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर स्मारकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेली वाद्ये आणि उत्साहपूर्ण घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेले.

प्रभात फेरी तान्या सेलिब्रेशन लॉनसमोरील, जिजामाता हायस्कूलजवळील कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, नृत्य, वेशभूषा, रितीरिवाज आणि संस्कृतीचे मनोहारी दर्शन उपस्थितांना घडले. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाला नगरसेवक रवि परतेकी, निशा कठौते यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच राज धुर्वे, विकल नवरे, भीमराव वरखडे, विजयलक्ष्मी कठौते यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या योगदानाचे कौतुक करताना आदिवासी संस्कृती, परंपरा व ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज व्यक्त केली. समाजातील युवकांनी शिक्षण, संघटन आणि प्रगतीच्या माध्यमातून पुढे यावे, तसेच आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.

बिरसा मुंडा समिती, खापा आणि अखिल आदिवासी कोल समाज विकास संस्था, गुमगाव-माईन-खापा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या आयोजनात सुनिल उईके, आनंद धुर्वे, रेणुका कठौते, संध्या कठौते, अर्चना वरखडे, नेहा कठौते, छोटू निकोसे, रवि डोंगरे, राहुल आष्टनकरयांच्यासह समितीच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाला आदिवासी बांधवांसह खापा शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Popular Articles