spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

यवतमाळ जिल्ह्यात दत्तक विधान नियमावलीअंतर्गत पहिला दत्तक आदेश

– “दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; दत्तक पालकांचे पालकत्वाचे स्वप्न साकार”

यवतमाळ :- महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली, २०२२ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिले दोन दत्तक विधान आदेश यशस्वीरीत्या पारित करण्यात आले. या ऐतिहासिक प्रक्रियेमुळे दोन बालकांना प्रेम, सुरक्षितता आणि हक्काचे कुटुंब मिळाले असून, दत्तक पालकांचे अनेक वर्षांचे पालकत्वाचे स्वप्न साकार झाले.

दत्तक विधान हि केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, बालकाला प्रेमळ कुटुंब, सुरक्षितता, प्रेम आणि उज्ज्वल भविष्य देणारी संवेदनशील सामाजिक प्रक्रिया आहे. यवतमाळ जिल्ह्यात पार पडलेल्या या दोन्ही दत्तक प्रकरणांमध्ये बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक कायदेशीर तरतुदी, कागदपत्रांची पूर्तता आणि विविध स्तरांवरील पडताळणी पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली.

जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित दत्तक विधान आदेश पारित करून या संवेदनशील प्रक्रियेला अंतिम मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणांनी समन्वयाने कार्य करत ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या प्रक्रियेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) माधुरी पावडे, बाल कल्याण समिती व इतर यंत्रणांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

बालकांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य

यवतमाळ जिल्ह्यातील या दोन दत्तक आदेशांमुळे कायदेशीर आणि नियमानुसार दत्तक विधान प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या सर्वोत्तम हिताची जपणूक आणि त्यांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

अधिकृत दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करण्याचे आवाहन

पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी बालक दत्तक घेताना कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा माध्यमाचा अवलंब न करता केवळ अधिकृत व कायदेशीर दत्तक प्रक्रियेचा अवलंब करावा, तसेच दत्तक विधानासंदर्भात जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

“प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळावे, प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित आणि आनंदी असावे” या भावनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत यवतमाळ जिल्ह्यातील हि दत्तक प्रक्रिया निश्चितच आशादायी आणि संवेदनशील सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरली आहे.

Popular Articles