spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लेखणीने कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, याचे भान पत्रकारांनी ठेवावे – पालकमंत्री संजय सिरसाट

– पुढारी होणे सोपे नाही; रोज ठेचा आणि टीकेचा सामना करावा लागतो – संजय सिरसाट 

– महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय अधिवेशनात २६ मान्यवरांचा ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने गौरव!

छत्रपती संभाजीनगर :- पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, पत्रकारांनी निर्भीडपणे काम करताना आपल्या लेखणीचा उपयोग समाजहितासाठी करावा. मात्र, बातमी लिहिताना आपल्या लेखणीमुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, याचे भान प्रत्येक पत्रकाराने ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच अडचणीच्या काळात पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आयोजित मराठवाडा विभागीय अधिवेशन व ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार सोहळा ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील गेटवे हॉटेलच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री संजय सिरसाट बोलत होते. कार्यक्रमाच्या मंचावर पत्रकार संघाचे संस्थापक तथा प्रदेश संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा आयोजक अनिल सावंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, जिल्हाध्यक्ष छबुराव ताके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ व्यक्तींना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार संघाचे संस्थापक तथा प्रदेश संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी संस्थानच्या वतीने निलेश सोमाणी, डॉ. विश्वासराव आरोटे, वैभव स्वामी, डॉ. संजय शिंदे आणि अनिल सावंत यांचा आशीर्वादरूपी विशेष सत्कार केला.

पत्रकारितेतही जबाबदारी महत्त्वाची : सिरसाट

यावेळी बोलताना पालकमंत्री संजय सिरसाट म्हणाले की, “पुढारी होणे सोपे नाही. रोज ठेचा लागतात आणि टीकेचा सामना करावा लागतो.” पत्रकारितेची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. पत्रकारांनी समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडले पाहिजेत. मात्र, एखादी बातमी प्रसिद्ध करताना तिचा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबावर, सामाजिक जीवनावर आणि भवितव्यावर काय परिणाम होईल, याचाही विचार केला पाहिजे.

पत्रकारांनी सत्य मांडताना सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या लेखणीचा उपयोग समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी करावा. “लेखणी ही समाजाच्या वेदनेला वाचा फोडणारी शक्ती आहे,” असेही सिरसाट यांनी नमूद केले.

‘लेखणीची क्रांती’वर परिसंवाद:

अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात ‘लेखणीची क्रांती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय लांबे, डॉ. शाहिद शेख, डॉ. संजय शिंदे, लेखिका जयश्री भगत, विष्णु आचार्य, वैभव स्वामी आदींनी परिसंवादात सहभाग घेतला.

प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी बदलत्या काळातील पत्रकारितेचे स्वरूप, डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेत होत असलेले बदल यावर सविस्तर भाष्य केले. तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांसमोर निर्माण झालेल्या नव्या संधी आणि आव्हानांचा आढावा घेत पत्रकारितेची विश्वासार्हता कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारांच्या दुःखात संघटना धावून जाते : डॉ. विश्वासराव आरोटे

प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ही संघटना पत्रकारांच्या केवळ सुखात नव्हे, तर त्यांच्या अडचणीच्या आणि दुःखाच्या काळातही धावून जाणारी संघटना आहे.” पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

पत्रकारांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी शासनाने पत्रकार आर्थिक विकास महामंडळावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी आरोटे यांनी केली. पत्रकारांच्या विविध मागण्या आणि अधिवेशनातील ठराव शासनापर्यंत पोहोचवून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पत्रकार कायम विरोधी पक्षात असतो’ : संजय भोकरे

पत्रकार संघाचे संस्थापक तथा प्रदेश संघटक संजय भोकरे म्हणाले की, पत्रकार हा कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असतो. त्यामुळे पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता जनहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडले पाहिजेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूपही बदलत आहे. माध्यमे टिकली पाहिजेत आणि त्यांची वाढ झाली पाहिजे. सक्षम आणि स्वतंत्र माध्यमे असतील तरच देशाची लोकशाही अधिक सक्षम व बळकट होईल. याची जाणीव राज्यकर्ते आणि प्रशासनाने ठेवली पाहिजे. शासनाने ‘लाडक्या बहिणी’सोबतच समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असे परखड मत भोकरे यांनी व्यक्त केले.

पत्रकारांचा विशेष सत्कार :

अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. धनंजय लांबे, डॉ. शाहिद शेख, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा विभागाच्या वतीने जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अधिवेशनाला मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा, पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहांवर परिसंवाद, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव आणि संघटनात्मक बांधणी या माध्यमातून अधिवेशनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा विभागातील पत्रकारांनी विशेष परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.