spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थी हितासाठी रूसा अंतर्गत प्रकल्पांना गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

· राज्य उच्च शिक्षण परिषदेची आढावा बैठक

मुंबई :- विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे तसेच रूसा आणि पीएम उषा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देऊन ते निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण परिषदेची आढावा बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, रूसाचे प्रकल्प संचालक बी. एन. पाटील, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रूसा, पीएम उषा तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती घेऊन प्रलंबित देयके आणि कामे पूर्ण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

रूसा-२ अंतर्गत संथ गतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचा विशेष आढावा घेण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (जि. रायगड) आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा या प्रकल्पांचा समावेश असून या प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. विद्यापीठे व महाविद्यालयांच्या प्रकल्पांना मुदतवाढ मिळण्यासंदर्भात केंद्र शासनाला पत्र पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून निधीचा प्रभावी वापर करावा. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत सुरू असलेली कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

Popular Articles