– दिव्यांगांना सक्षम आणि स्वावलंबी करणारा उपक्रम
– 4 हजार दिव्यांगाना शिबिराच्या माध्यमातून लाभ
– मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
नागपूर :- दिव्यांगांच्या जीवनात आनंद निर्माण करतानाच त्यांना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग शिबिराच्या माध्यमातून सुमारे 4 हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. विविध प्रकारची प्रकारच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी 2 हजार 773 अपंगांना विविध साहित्य नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपुर फूट यांनी 36 तंत्रज्ञ आणि तज्ञ डॉक्टरांची चमू यासाठी तब्बल चार दिवस उपलब्ध करून देण्यात आली होती. कविवर्य सुरेश भट सभागृह येथे दिनांक 7 ते 10 ऑगस्टपर्यंत दिव्यांगांसाठी विशेष साहित्याच्या वाटपातून सोबतच तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालय, नागपूर महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कृत्रिम अवयव आणि कॅलिपर्सची निर्मिती शिबिराच्या ठिकाणीच करून अवघ्या तीन तासात लाभार्थ्यांना हे साहित्य बसविण्यात आले. त्यामुळे 147 लाभार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची किमया या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. या शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक दिव्यांगांची तपासणी करण्यात आली असून त्यांना दिव्यांगावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दिव्यांग तपासणी व साहित्य वाटप या शिबिरामध्ये 2 हजार 673 दिव्यांगानी नोंदणी केली होती तसेच शिबिरादरम्यान एवढेच लाभार्थी तपासणीसाठी उपस्थित होते.

तीन तासात उभे राहण्याची किमया
दिव्यांग तपासणी व साहित्य वाटप या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर 147 लाभार्थ्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आले, तसेच 462 लाभार्थ्यांना कॅलिपर व 641 लाभार्थ्यांना वाकर आधी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या लाभार्थ्यांना 696 तसेच 116 अंध व्यक्तींना ब्लाइंड स्टिक, 1हजार 072 लाभार्थ्यांना कर्णबधिर हेअरिंग एड्स उपलब्ध करून देण्यात आले.
दिव्यांग व्यक्ती यांना विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेले युडीआयडी प्रमाणपत्र तसेच संजय गांधी निराधार योजनेची नोंदणी व सीआरसी अशा एकूण 1हजार 311 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या शिबिराच्या माध्यमातून एकूण 2 हजार 673 लाभार्थ्यांना विविध साधनांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग तपासणी शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील व बाहेरील अशा चार हजार 84 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
दिव्यांगांच्या जीवनात आनंद फुलविणारा हा उपक्रम ठरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग व्यक्तींच्या मानधनांमध्ये अडीच हजार रुपये पर्यंतची वाढ तसेच दहा वर्षाखालील सर्वांना दोष असलेल्या मुलांची ओळख पटविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे त्यांना ऐकण्याची व बोलण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
भगवान महावीर विकलांग सहायता समिती आणि नागपूर महानगरपालिकेने या शिबिरामध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून दिले तसेच शिबिरासाठी उपस्थित असलेल्या दिव्यांगांना इस्कॉन अन्नमृत संस्था तसेच प्रशांत उगेमोगे यांच्या सहकार्याने शिबिरासाठी उपस्थित सर्व लाभार्थ्यांची भोजनाची व्यवस्था केली.दिव्यांग व्यक्ती युडीआयडी कार्ड पासून वंचित राहणार नाही तसेच या कार्डाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.





