spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

हंसराज, भंडारा :- राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवीन उत्पादन पद्धती आणि शेतीशी निगडित जागतिक स्तरावरील बदलांची माहिती मिळावी, यासाठी कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांचे परदेश अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यासाठी महिला शेतकरी १, केंद्र/राज्य कृषि पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेते शेतकरी १ आणि इतर शेतकरी ३, असे एकूण ५ शेतकऱ्यांचे लक्षांक प्राप्त झाले आहेत.

या अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकरी स्वतःच्या नावावरील मागील सहा महिन्यांतील वैध ७/१२ व ८-अ उतारा, आधार प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रत, वैध पासपोर्टची प्रत आणि आवश्यक स्वयंघोषणापत्रासह अर्ज करू शकतात. अर्जदार हा स्वतः शेतकरी असावा, त्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे तसेच त्याच्याकडे AgroStack अंतर्गत Farmer ID असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याचे वय दौऱ्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नसली तरी परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहील. अर्जदाराकडे वैध पासपोर्ट असून दौरा सुरू होताना त्याची वैधता किमान तीन महिन्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेत कार्यरत व्यक्ती तसेच डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, अभियंता, कंत्राटदार आदी व्यावसायिक या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासन, कृषि विद्यापीठ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा. एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.

अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतरही वैद्यकीय तपासणी व आवश्यक आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. शेतकरी निवडीचा अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राहणार आहे.

इच्छुक शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, भंडारा किशोर पात्रिकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.