spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या 20 वाहनांवर कारवाई; अडीच लाखांहून अधिक दंड

हंसराज, भंडारा :- शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांतून धोकादायक व असुरक्षित वाहतूक होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वतीने आज भंडारा शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची बेकायदेशीर व धोकादायक वाहतूक करणाऱ्या तसेच प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या आणि विना परवानगी अवैध गॅस किट बसविलेल्या 20 खाजगी/स्कूल बस वाहनांवर कारवाई करण्यात आली. कागदपत्रांची मुदत संपलेली, परवाना नसलेली तसेच अवैध गॅस किट असलेली 9 वाहने अटकावून ठेवण्यात आली असून, एकूण 2 लाख 57 हजार 300 रुपयांचा तडजोड शुल्क/दंड आकारण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. पालक व शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची ने-आण केवळ मान्यताप्राप्त व वैध परवाना असलेल्या वाहनांतूनच करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांच्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक बालाजी वर्धन, अमरसिंह चोथे, प्रतिक मोहिते तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ, रितेश चव्हाण, गुलशनकुमार चावरे आणि मेघाराणी काशिद यांनी केली.

Popular Articles