spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उबाठा गट काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी संजय राऊतांनी कोट्यवधींचा सौदा केला

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार 

मुंबई :- वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली आणि हिंदुत्वाच्या विचारांवर उभी राहिलेली शिवसेना पैशांनी विकत घेता येत नाही. उबाठा गट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधण्यासाठी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी किती हजार कोटी रुपयांचा सौदा केला, याचे उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावे. माझ्या माहितीनुसार हा दहा हजार कोटी रुपयांचा सौदा होऊन त्यातील २० टक्के म्हणजेच २ हजार कोटी रुपये कमिशन म्हणून संजय राऊत यांना मिळाले, असा घणाघाती प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रदेश नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद ऐकून संजय राऊत यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेल्या बाबरी मशीद, तिहेरी तलाक, नोटबंदी विरोधातील याचिका आणि गुजरात दंगलीच्या प्रकरणांमध्ये निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. कपिल सिब्बल म्हणजे फार मोठे तिस्मारखान आहेत, अशा अविर्भावात संजय राऊत यांनी राहू नये. संजय राऊत यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही, असेही बन यांनी सुनावले.

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा आपल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे, असे सांगत बन पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाने कायद्यानुसार आणि पक्षाच्या घटनेनुसार निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व काय होते हे महाराष्ट्राने अडीच वर्ष पाहिले आहे. चोरून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर अडीच वर्षांत तुम्ही काय केले? घरात बसून ठिपक्यांची रांगोळी बघत होतात, कोमट पाणी प्या, फेसबुक लाइव्ह करा, हेच तुमचे धंदे महाराष्ट्राने पाहिले. तुम्ही मातोश्रीचे दरवाजे उघडत नव्हता, आमदारांना भेटत नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाला दोष देऊन काही उपयोग नाही. आपल्या पक्षाची अशी अवस्था का झाली, हे आधी आपल्या मालकांना विचारा.

बन पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राष्ट्र प्रथम याच भूमिकेतून त्यांना काम करायचे आहे. त्यांना मातोश्री टू बांधायचे नाहीये, त्यांना घरात बसून ठिपक्यांची रांगोळी बघायची नाहीये, त्यांना आपल्या मुलाचे करिअर सेट करायचे नाहीय आणि आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष विकायचा नाहीये. त्यांना देश पुढे घेऊन जायचा आहे. अंतर्गत वाद आणि संघर्ष कुठे असेल तर तो मातोश्रीवर आहे. संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मातोश्रीवर पहायला मिळतो. तुमचे भविष्य काय आहे, हे महाराष्ट्राला माहित आहे. विनाकारण खोटे बोलण्याच्या भानगडीत पडू नका, असेही बन यांनी सुनावले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.