नागपूर :- उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराजांच्या नामस्मरणाने आणि भक्तीच्या अखंड गजराने नागपूर शहरातून शेगावकडे जाणाऱ्या पायदळ दिंडी यात्रेचे आयोजन निर्मलनगरी येथील संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने हे २५ वे वर्ष असून ही पवित्र दिंडी यात्रा १८ ऑगस्ट रोजी, सकाळी संत गजानन महाराज मंदिरातून प्रस्थान करणार आहे. सुमारे ३२० किलोमीटरचा दहा दिवसांचा हा पायी प्रवास भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. दिंडी यात्रेदरम्यान शिस्त, सेवा आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडणार असून, मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. टाळ- मृदंगाच्या निनादात, संतांच्या नामघोषात आणि हरिनामाच्या गजरात दिंडीचा प्रवास होणार आहे. या दिंडीत वारकरी, पताकाधारी, टाळकरी, वीणेकरी तसेच कीर्तनकार आणि गायकांचा ताफा दिंडीचे आकर्षण ठरणार असून यातील सहभाग राहणार आहे. असा राहणार दिंडीचा मार्ग १८ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता श्रींची आरती झाल्यानंतर सकाळी ५ वाजता दिंडीचे प्रस्थान होईल. त्यानंतर दिंडीचा प्रवास टप्प्याटप्प्याने शेगावच्या दिशेने सुरू राहणार आहे. १९ ऑगस्ट रोजी बाजारगाव ते जगदंबा माता मंदिर, २० ऑगस्ट रोजी दत्त मंदिर तळेगाव, २१ ऑगस्ट रोजी दासटेकडी, २२ ऑगस्ट रोजी संत सभागृह नांदगावपेठ, २३ ऑगस्ट रोजी नांदगावपेठ ते म्हैसूर, २४ ऑगस्ट रोजी म्हैसूर ला मुक्काम राहील. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी संत गुलाबबाबा आश्रम हिंगणी, २६ ऑगस्ट रोजी आडसूड, तर २७ ऑगस्ट रोजी आडसूड ते श्रीक्षेत्र शेगाव असा प्रवास होईल. शेगाव येथे दर्शन व मुक्कामानंतर २८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन राखी अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व वारकरी नागपूरकडे परतीचा प्रवास करतील. दिंडीच्या संपूर्ण प्रवासादरम्यान विविध ठिकाणी भजन, कीर्तन, हरिपाठ तसेच सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण दहा दिवसांचा प्रवास भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडणार आहे. एकात्मता, सेवा आणि अध्यात्माचा संदेश श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आयोजित करण्यात आलेली ही पायदळ दिंडी केवळ धार्मिक यात्रा नसून एकात्मता, सेवा, शिस्त आणि अध्यात्मिक संस्कारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारी भक्तीची परंपरा आहे. नागपूर ते शेगाव या सुमारे ३२० किलोमीटरच्या प्रवासात भाविक संत गजानन महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करणार आहेत. दिंडीच्या आयोजना मुळे नागपूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, अधिकाधिक भाविकांनी या पवित्र यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रींच्या दर्शनासाठी नागपूर ते शेगाव पायदळ दिंडी यात्रा १८ ऑगस्ट पासून रवाना


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




