चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात आज, गुरुवार १३ ऑगस्ट रोजी उपमहापौर प्रशांत दानव यांच्या हस्ते भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी आकाशात तिरंगी फुगे सोडून उपक्रमाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.प्रथम वंदेमातरम,ध्वज उंचावल्यावर राष्ट्रगीत व नंतर राज्यगीत म्हणण्यात आले.
उपस्थितांना संबोधित करताना उपमहापौर प्रशांत दानव यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. ते म्हणाले, “असंख्य वीरांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य लाभले आहे. या स्वातंत्र्याचे जतन करतानाच आपल्या चंद्रपूर शहराला विकासाच्या नवीन उंचीवर नेणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

मनपाच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून चंद्रपूरला एक सुंदर, स्वच्छ आणि प्रगतीशील शहर बनवूया,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, उपायुक्त संदीप चिद्रावार, उपायुक्त शेषराव टाले, शहर अभियंता रवींद्र हजारे, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले, नगर सचिव संतोष गर्गेलवार, नगर रचनाकार कुशल कडू देशमुख तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





