spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहरातील 518 भाग्यवंतांच्या घरांची स्वप्नपूर्ती

– महापौर, आयुक्त व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संगणकीय पद्धतीने सोडत

नागपूर :- शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परवडणारी घरे स्वप्नपूर्ती योजनेत नारा-नारी भागात उभारण्यात येणाऱ्या‍ 518 सदनिकांची महापौर निता ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृहात संगणकीय पद्धतीने आज (ता. 13) सोडत काढण्यात आली. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, दुर्बल घटक समितीच्या सभापती लक्ष्मी हत्तीठेले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती रुतिका मसराम, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, हनुमाननगर झोनच्या सभापती ज्योती देवघरे, नगरसेविका मानसी सिमले, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त  मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता विजय गुरुबक्षानी, कार्यकारी अभियंता सुनील उईके, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्निल लोखंडे,  प्रतिक गजभिये या योजनेचे विकासक गौरव अग्रवाल उपस्थित होते.

अडीच लाखांचे अनुदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत शहरातील दुर्बल घटकातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना शहराच्या विविध भागात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नारा-नारी भागात 1 बीएचके व 2 बीएचके सदनिका प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. यासाठी 1919 अर्जदारांनी सदनिकांसाठी अर्ज केले होते. यात 1 बीएचके सदनिका 210 तर 2बीएचके सदनिका 308 बांधण्यात येणार आहे. 1बीएचके 15 लाख तर 2बीएचके 21 लाख रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांना अडीच लाख रुपयांचे अनुदान सुद्धा मिळणार आहे.

सोडत पाहण्यासाठी गर्दी

संगणकीय पद्धतीने झालेल्या या सोडतीसाठी कविवर्य सुरेश भट सभागृहात गर्दी केली होती. ज्यांचे नाव सोडतीमध्ये आले त्यांना तात्काळ एसएमएसने सूचित करण्यात आले आहे. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी प्रवर्ग तसेच दिव्यांगांसाठी सदनिकांचे आरक्षण होते. नागरिकांनी ज्या प्रवर्गातून सदनिकांसाठी अर्ज केले होते. त्या सर्वांचे नावे संगणकात फिड करण्यात आले. यानंतर रिमोटचा वापर करून संगणकात फिड केलेल्या डाटातून रँडम पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. सोडत चार गटात विभागली होती. यात दिव्यांग आरक्षित, दिव्यांग अनारक्षित, एससी, एसटी व ओबीसी आरक्षित तसेच अनआरक्षित अशा गटांचा समावेश होता. सोडत लागलेल्या काही भाग्यवंतांचा महापौर निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांच्या हस्ते तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. सोडत निघाल्यानंतर लगेच मोठ्या स्क्रिनवर लाभार्थ्यांची नावे झळकविण्यात आली. सोडतीच्यावेळी लहान बालकांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले होते.

सर्वांना घरे देण्याचा मानस – महापौर

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर या संकल्पेनेची पूर्तता करण्याच्या वाटचालीतील हा एक टप्पा आहे. या योजनेसाठी 1919 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 518 भाग्यवंतांना सदनिका मिळाल्या. उर्वरित लोकांनी नाराज होण्याची आवश्यकता नाही. पुनापूर, हुडकेश्वर भागात सुद्धा या प्रकारे सदनिका उभारण्यात येणार आहे. सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर मनपा कटिबद्ध आहे. घर नाही, असा कुणीही व्यक्ती नागपुरात राहणार नाही, यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येईल, असेही ठाकरे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थायी समितीच्या सभापती  शिवानी दाणी-वखरे यांनी केले. यावेळी त्यांनी या प्रकारे योजना राबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचे स्वागत केले. महापौर निता ठाकरे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरूवात केली. तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

मनपाच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध

संगणकीय सोडत कशा प्रकारे काढण्यात येणार आहे, यासंदर्भातील सर्व माहिती एका चित्रफितीद्वारे नागरिकांना सोडत सुरू होण्यापूर्वी दाखविण्यात आली. याचवेळी प्रतिक्षा यादीत असलेल्यांची यादीची सोडत काढण्यात आली. ज्या भाग्यवंतांची नावे आजच्या सोडतीमध्ये आली आहे. त्यांची नावे मनपाच्या संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे. यात त्यांच्या सदनिकांचे क्रमांकही नमूद केले आहेत. दिव्यांगांना तळमजल्याच्या सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार मुख्य अभियंता लिना उपाध्ये यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.