spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जखमी चितळाला ‘गुड मॉर्निंग योगा ग्रुप ’चा मदतीचा हात

– मिरर हाऊस मार्गावर जखमी अवस्थेत आढळले हरिण ; योगा ग्रुपच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून घेतली काळजी, जंगलात सोडले

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे 

नवेगाव बांध :- नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान संकुलातील मिरर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या चितळाला गुड मॉर्निंग योगा ग्रुपच्या सदस्यांनी वेळीच मदतीचा हात देत त्याचे प्राण वाचविण्यासाठी धाव घेतली. सकाळच्या वेळी चितळ जखमी अवस्थेत आढळून येताच सदस्यांनी त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेत त्याची पाहणी केली.

चितळाच्या तोंडाला, मानेला आणि पायाला दुखापत झाल्याचे यावेळी दिसून आले. दुखापतीमुळे आणि उष्णतेमुळे त्याचे संपूर्ण शरीर तापलेले होते. अशा अवस्थेत त्याची प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून सदस्यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्याला हाताळले. काही वेळ शांत ठेवल्यानंतर त्याला पाणी पाजण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चितळाला सुरक्षितपणे राष्ट्रीय उद्यान संकुलातील जंगल परिसरात सोडण्यात आले.

माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय ! रस्त्याच्या कडेला असहाय्य जखमी अवस्थेत पडलेल्या वन्यप्राण्याकडे केवळ बघ्याची भूमिका न घेता योगा ग्रुपच्या सदस्यांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरली. वेळीच मदत मिळाल्याने जखमी चितळाला सुरक्षितपणे जंगलात परतता आले.

वन्यजीव हा निसर्गसाखळीचा महत्त्वाचा घटक असून, संकटात सापडलेल्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांची संवेदनशीलता तितकीच महत्त्वाची आहे. जखमी किंवा अडचणीत सापडलेला वन्यप्राणी आढळल्यास त्याला घाबरवू नये, गर्दी करू नये किंवा स्वतःहून उपचार करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तातडीने वनविभागाला माहिती देऊन आवश्यक मदत मिळवून देणे गरजेचे आहे.

यावेळी गुड मॉर्निंग योगा ग्रुपचे सदस्य पंकज परशुरामकर, उमेश डोंगरवार, विजय संग्रामे, शिक्षक नामदेव पुस्तोडे, सेवानिवृत्त वन अधिकारी भाऊराव साखरे यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

जखमी वन्यजीवांसाठी तत्परता हाच खरा संवर्धनाचा मंत्र

नवेगाव बांधच्या जंगल परिसरात वन्यजीव आणि नागरिक यांच्यातील सहअस्तित्वाचा सकारात्मक संदेश या घटनेतून पुढे आला आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही संवेदनशीलता आणि जबाबदारीने पुढाकार घेण्याची गरज आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.