spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विकासाच्या नव्या पर्वाकडे नागपूरची वाटचाल – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

· सिंचन, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानाला गती

· २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्प पूर्ततेसाठी नागपूर जिल्हा सज्ज

नागपूर :- नागपूर जिल्ह्याने विकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून, सिंचन, आरोग्य, कृषी, सामाजिक कल्याण, महिला सक्षमीकरण, क्रीडा, पायाभूत सुविधा, पोलीस प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाला नवी गती मिळाली आहे. जिल्ह्यातील विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होत आहेत. नागपूरला देशातील अग्रगण्य आणि विकसित प्रदेश म्हणून घडविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आ. डॉ. राजीव पोतदार, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर आणि विदर्भाला लॉजिस्टिक्स, ऊर्जा, कृषी प्रक्रिया, माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. शिक्षण, कृषी, आरोग्य, क्रीडा, मिहान, महामेट्रो, रस्ते विकास, नागपूर स्पोर्ट्स हब, अंबोरा पर्यटन, रामटेक येथील चित्रनगरी, नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र आणि स्टेट डेटा सेंटर यांसारख्या विविध प्रकल्पांमुळे नागपूरच्या विकासाला व्यापक दिशा मिळत आहे. २०४७च्या विकसित भारताच्या संकल्पाला मूर्त रूप देण्यासाठी नागपूर आणि विदर्भाला देशातील समृद्ध व अग्रगण्य प्रदेश बनविण्याच्या दिशेने शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाची ही वाटचाल पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सामाजिक कल्याण विभागाच्या माध्यमातून चांगले काम करण्यात आले आहे. मिहान-एअरपोर्ट परिसरात ८२ एकर जागेवर कन्व्हेन्शन, सांस्कृतिक व प्रदर्शन केंद्राची तयारी सुरू आहे. सिंचन क्षेत्रात चिचघाट उपसा सिंचन योजनेतून ३हजार ७१५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. खैरी कालव्याच्या विशेष दुरुस्तीमुळे ४७३ हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली असून, भिड-चिचघाट योजनेतून ९,६४० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य सुविधांना बळ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ६८ ‘आपला दवाखाना’ केंद्रांमधून नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ९३ हजार ९१४ रुग्णांवर ३०७ कोटी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार २९५ आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले आहे.

६० एआय अंगणवाड्या; नागपूर देशातील पहिला जिल्हा

जिल्ह्यातील ६० आरोग्य केंद्रांना NQAS मानांकन मिळाले असून, १५ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच ६० एआय अंगणवाड्यांमुळे नागपूर हा देशातील पहिला जिल्हा ठरल्याचा उल्लेख करण्यात आला असून, या उपक्रमामुळे कुपोषणात घट झाली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनात प्रभावी वापर

नागपूर शहर पोलिसांकडून AI आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट पोलिसिंगचा वापर करण्यात येत आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनीही AIच्या सहाय्याने गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग

एनएमआरडीएच्या माध्यमातून ‘नवीन नागपूर’ प्रकल्पासाठी जमीन संपादन व निधीच्या कामाला गती देण्यात आली असून, बाह्य वळण रस्ता प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. महामेट्रोच्या मेट्रो टप्पा-३च्या ५५ किलोमीटर विस्तारासाठी डीपीआर व आराखडा तयार करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून ८६५ कोटी रुपयांच्या २४० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे. खरीप २०२६ मध्ये ७६,४७६ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. भाषणात राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीपंपांच्या वीजबिलमाफीचा उल्लेख करण्यात आला.

ते पुढे म्हणाले की, महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या शिबिरांमधून महिलांना शेतकरी कार्डचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना बँक कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.