spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडचिरोलीच्या रानभाज्यांना ‘राजाश्रय’; ‘गडचिरोली ब्रँड’द्वारे राज्यभर बाजारपेठ – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

– रानभाज्या व वनोपजांचे ब्रँडिंग; नैसर्गिक-सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील रानभाज्यांची गुणवत्ता, चव आणि पौष्टिक मूल्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. या नैसर्गिक संपदेला केवळ महोत्सवापुरते मर्यादित न ठेवता शासनाचा ‘राजाश्रय’ मिळवून दिला जाईल. रानभाज्या, चारोळी व अन्य वनोपजांचे मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग करून स्वतंत्र ‘गडचिरोली ब्रँड’ विकसित करण्यात येईल. या उत्पादनांना राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कृषी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

सोनपूर येथील ‘आत्मा’ कार्यालय परिसरात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आत्मा प्रकल्प संचालिका तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे तसेच शेतकरी व महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या.

गडचिरोली हा वनसंपदेने समृद्ध जिल्हा असून येथील रानभाज्या पूर्णतः नैसर्गिक वातावरणात वाढतात. त्यामुळे त्यांची मूळ चव, गुणवत्ता आणि वैशिष्ट्य टिकवून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ‘गडचिरोली ब्रँड’च्या माध्यमातून विविध ठिकाणी कायमस्वरूपी स्टॉल व विक्री केंद्रे सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धतीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीची पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचा विकास करताना वनसंपदा, जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञान जपले जाईल. महिला बचत गटांना रानभाज्या व वनोपजांचे प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच कृषी विभाग व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (PoCRA) माध्यमातून स्ट्रॉबेरी, शिंगाडा, डाळिंब यांसारख्या पिकांच्या लागवडीद्वारे पीक विविधीकरणाला चालना दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात १४८ हून अधिक प्रकारच्या रानभाज्या-

कृषी अधिक्षक अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रास्ताविकात गडचिरोली जिल्ह्यात १४८ हून अधिक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरीत्या आढळत असल्याची माहिती दिली. नागरिकांना या रानभाज्यांची ओळख व पाककृतींची माहिती देणे आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना देणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोकरा माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.

रानभाजी अभ्यासक संगीता ठलाल यांनी कडू कांदा, परसोड (देवभात/देवधान), मटारू, मोमनारू आणि मंड्या यांसारख्या पारंपरिक रानभाज्या व अन्नघटकांची माहिती दिली. रानभाज्यांवरील पारंपरिक ज्ञानाचे संशोधन व दस्तऐवजीकरण केल्याबद्दल सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

महोत्सवात करटुले, पाथरी, काटेमाट, शेवगा, कोयार, कुळा, अंबाडी, दिंडा, मटारू, तांदुळजा, हळद, खापरखुटा, बेस्ता कांदे, मशरूम, केना, भुईआवळा यासह विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यावेळी पाककला स्पर्धेत रानभाज्यांपासून तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे सादरीकरण करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.