नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून पूर्णतः मुक्त होण्याच्या मार्गावर असून, या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर निता ठाकरे यांनी जलपूजन करून अंबाझरी तलावात नौकाविहारचा आनंद घेतला. अग्निशमन विभागाच्या बोटीतून करण्यात आलेल्या या नौकाविहार प्रसंगी नगरसेवक व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात खासदार माया ईवनाते, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार प्रा. अनिल सोले, मनपाच्या परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, एआयएमआयएमचे गट नेते शकील पटेल, इंडियन मुस्लिम लीगचे गट नेते असलम मुल्ला, मनपाच्या विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, निधी तेलगोटे, दर्शनी धवड,संतोष देवी लढ्ढा, झोन सभापती धनश्री देशपांडे, तारा यादव, आसिफ शेख, सीमा डवरे नगरसेवक विजय झलके, जितेंद्र कुकडे, विनोद कन्हेरे, मनोज साबळे, अभिजीत झा, विजय होले, विनय दाणी, यांच्यासह मनपा आयुक्त डॉ विपीन, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, वनविभागाचे हाडा, मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, धनंजय जाधव यांच्यासह इतर विविध समितीचे सभापती, नगरसेवक तसेच अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील काही महिन्यांपासून जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलावाला मुक्त करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू होते. महपौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, मनपा आयुक्त व नगरसेवक योगेश पाचपोर यांनी अंबाझरीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले. दर आठवड्यात त्यांनी या ठिकाणी भेट देऊन जलपर्णी काढण्याच्या प्रगतीची पाहणी केली आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले प्राप्त झाले आहे.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागरिकांचा सुखांक वाढविण्याचे उत्तम कार्य नागपूर महानगरपालिकेमार्फत केले जात आहे, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा जलपर्णीमुक्त अंबाझरी तलाव आहे. तसेच त्यांनी अंबाझरी तलावात एमआयडीसी व वाडी येथून प्रदूषित पाणी येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असून, वारंवार सूचना देऊनही पाणी आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ताकीद दिली. याशिवाय नागरिकांसाठी अंबाझरी तलावात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली. तसेच कवीवर्य सुरेश भट सभागृहात बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचे सुचवत यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सवाद्वारे स्पॉन्सरशिप दिली जाईल असे स्पष्ट केले. तर नीरी मार्फत तलावात येणाऱ्या पाण्याची बीओडी व सीओडी चाचणीचा अहवाल मागवण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच, स्वच्छता मोहीम राबविल्याबद्दल स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे व नगरसेवक योगेश पाचपोर यांचे विशेष अभिनंदन केले. भांडेवाडी येथील कचरा वर्गीकरण व बायोसीएनजी प्रकल्पामुळे शहर स्वच्छ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापौर निता ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अंबाझरी तलाव हा केवळ एका प्रभागाचा नसून संपूर्ण नागपूर शहराचे वैभव आहे. जलपर्णीमुळे हा तलाव झाकोळला गेला होता, परंतु सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाले आहे. कमी खर्चात इतर विभागांची मदत घेऊन यशस्वी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी मनपा आयुक्त डॉ. विपिन यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी जलपर्णी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तलावात गॅब्रिज ब्रिज बांधल्याचे सांगत, अहोरात्र मेहनत घेऊन पोकलेन व जेसीबी मशीनच्या सहाय्याने हे कार्य कसे पूर्ण झाले याची माहिती दिली. तसेच या उपक्रमासाठी मनपाला इतर सर्व विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक योगेश पाचपोर यांनी मानले.
उत्तम कार्य करणाऱ्यांचा सत्कार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात एक्व्हेटिक वीड हार्वेस्टर मशीन आटोक्राय मशीनरी हैदराबादच्या कार्यकारी अधिकारी संतोषी बुद्धिराजू, सर्वश्री अविनाश कावरे, संजय कारिया, सुरेश लोहकर, मुलचंद कापसे, सूरीबाबू किलारी, मिलिंद मोंबे, डायमंड, शर्मा, मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, एफडीएमचे अधीकारी श्रीकांत पाटील,वन विभाग अधिकारी ममता भोसले, वैशाली लिखारे, श्रीमती शीतल शिंदे, मेट्रोचे पार्कचे अधिकारी पुरुषोत्तम कडू, व अग्निशमन चे जवान यांचा समावेश होता.





