spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा-पोलिसांचा स्मार्ट पुढाकार

– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘स्मार्ट पोलिस चौकी’चे लोकार्पण

नागपूर :- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका व नागपूर शहर पोलिस यांच्या माध्यमातून लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदान(कच्छीविसा), येथे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्मार्ट पोलिस चौकी’ चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे यांच्या होत्या.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपिन, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस आयुक्त विनिता साहू, एआयएमआयएमचे गटनेता  शकील पटेल, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा, सभापती लकडगंज झोन महेश्वरी बिसेन, नगरसेवक बालू रारोकर, नगरसेविका अर्चना पडोळे, नगरसेवक रामदास शाहू, नगरसेवक शेषराव गोतमारे, नगरसेविका सरिता कावरे, झोन सभापती सीमा ढोमणे, मनपा सहाय्यक आयुक्त विजय थूल, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर, पोलिस उपायुक्त राहुल मदने, पोलिस उपायुक्त विशेष शाखा धर्मेश धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त लकडगंज विभाग शिवप्रसाद पारवे, तसेच इतर नगरसेवक, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस विभागाने संवेदनशील नागरिकाभिमुख होऊन जनतेला विश्वासात घेऊन काम करण्याकडे जास्त लक्ष घालावे यामुद्द्यावर भर दिला. शहरातील पोलिसिंग व्यवस्था अधिक तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. शहरातील प्रत्येक चौकाला एआय प्रणालीशी जोडून पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि संबंधित पोलिस ठाण्याशी जोडण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्मार्ट पोलिस चौकीचे कौतुक करताना त्यांनी सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या पुढाकाराचेही कौतुक केले. कमी जागेत अधिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही चौकी म्हणजेच ‘कमी जागेत जास्त व्यवस्था’ या संकल्पनेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहरातील पोलिस व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळात शहरात नवीन तंत्रज्ञानावर आधारित सुमारे १,५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशयित व्यक्तींची ओळख पटविणे, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती पोलिस यंत्रणेला तातडीने मिळणे आणि संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना अधिक प्रभावीपणे कार्य करता येणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर निता ठाकरे यांनी शहराचा विकास, सुशोभीकरण आणि भयमुक्त शहराच्या निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येणाऱ्या विषयांवर योग्य आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होते, त्यामुळे अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. मनपाच्या माध्यमातून शहरातील आणखी काही ठिकाणे पोलिस चौकींसाठी निश्चित करण्यात आली असून, पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल, वर्धमान महावीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसाठीही निवडलेल्या ठिकाणी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ज्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी पोलिस आयुक्तांना केली.

पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत काम केल्यानंतर विदर्भात आणि विशेषतः नागपूर शहरात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्मार्ट पोलिस चौकीच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज चौकी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. आगामी काळात हैदराबादमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘निर्भया पथका’च्या धर्तीवर नागपुरातही उपक्रम सुरू करून महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी स्मार्ट पोलिस चौक्यांमुळे नागरिकांना सुरक्षेबाबत अधिक आश्वस्त करता येईल, असे सांगितले. शहरातील गरजेनुसार योग्य ठिकाणी आणखी पोलिस चौक्या उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. काही भागांत पोलिस ठाण्यांसाठी जागेची कमतरता असल्याने मनपाने आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली. कळमना पोलिस ठाणे सध्या मार्केट परिसरात असल्याने मार्केटच्या बाहेर योग्य जागा शोधून ती पोलिस ठाण्यासाठी उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सुचविले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी केले. ‘हे केवळ एका पोलिस चौकीचे लोकार्पण नसून, अधिक जबाबदार आणि तंत्रज्ञानयुक्त सेवा देणाऱ्या पोलिस चौकीचे लोकार्पण आहे,’ असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.