हंसराज,भंडारा :– मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी रविवारी राज्यभरात घेण्यात आलेल्या परीक्षेचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, बाधित विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचा वेळ वाया, केंद्रांवर संताप भंडारा येथील बंसीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र होते. परीक्षा सुरू असतानाच अचानक सर्व्हर डाऊन झाले आणि इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे परीक्षेसाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला. अनेक विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण करता आला नाही, ज्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल या प्रकरणाची दखल घेत नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “राज्यात वारंवार पेपरफुटी, सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत, पण शासन याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नुकसानच होत नाही, तर त्यांच्या रोजगाराच्या संधीही हिरावल्या जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
एजन्सींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी एजन्सींवरही पटोले यांनी ताशेरे ओढले. “ज्या एजन्सींना ही कामे दिली जातात, त्यांच्या कामकाजात वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याशी असा खेळ खेळणे थांबवले पाहिजे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
परीक्षा पुन्हा घ्यावी तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना न्याय मिळावा यासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. “खऱ्या अर्थाने जे विद्यार्थी पात्र आणि सक्षम आहेत, त्यांचीच निवड झाली पाहिजे. सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.








